कोरोना लसीकरणासाठी BMC ची 'हर घर दस्तक' मोहीम

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 'हर घर दस्तक' ही मोहीम राबवण्यात येत आहे. विशेषतः 12 ते 14 आणि 15 ते 17 वर्ष वयोगटातील मुला-मुलींचं लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे.

या मोहिमेत महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन भेटी देण्यात येत आहेत. या भेटीआधारे 12 ते 14 आणि 15 ते 17 वयोगटातील पहिली आणि दुसरी मात्रा न घेतलेली मुलं तसेच प्रतिबंधात्मक मात्रा न घेतलेले 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांच्या याद्या तयार करण्यात येत आहेत.

ही मोहीम दिनांक 1 जून 2022 पासून सुरु करण्यात आली आहे. दिनांक 31 जुलै 2022 पर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे. घराजवळच्या कोरोना लसीकरण केंद्रावर जाऊन पात्र व्यक्तिंनी लस घ्यावी, यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात दिनांक 16 जानेवारी 2021 पासून कोविड-19 विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. या अंतर्गत 18 वर्ष वयावरील सर्व पात्र नागरिकांचं पहिल्या मात्रेचं 112 टक्के आणि दुसर्‍या मात्रेचं 101 टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आलेलं आहे.

दिनांक 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 17 वर्ष वयोगटातील लाभार्थ्‍यांचं तसेच दिनांक 16 मार्च 2022 पासून 12 वर्ष ते 14 वर्ष वयोगटातील लाभार्थ्‍यांचं कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण करण्‍यात येत आहे. यासाठी महानगरपालिका आणि शासकीय रुग्णालयात 107, खासगी रुग्णालयात 125 अशी एकूण 232 कोविड-19 लसीकरण केंद्रं कार्यन्वित करण्यात आली आहेत.


हेही वाचा

मास्क बंधनकारक नाही, तर... - राजेश टोपे

पुढील बातमी
इतर बातम्या