Advertisement

मास्क बंधनकारक नाही, तर... - राजेश टोपे

केंद्र आणि राज्याच्या दुमतामुळे नागरिकांमध्ये मात्र गोंधळ निर्माण झाला आहे... राजेश टोपे काय म्हणाले मास्क संदर्भात जोणून घ्या...

मास्क बंधनकारक नाही, तर... - राजेश टोपे
SHARES

राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता आहे. राज्य सरकार आणि पालिका कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर लक्ष ठेवून आहे. वाढते रुग्ण पाहता केंद्रीय आरोग्य सचिवांनी देखील ५ राज्यांना पत्र लिहून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे राज्यात मास्कसक्ती करण्यात आल्याची चर्चा रंगली. पण यासंदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

महाराष्ट्रात बंदिस्त ठिकाणी मास्क सक्ती करण्याचं आरोग्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे. मात्र यावरून प्रशासन आणि मंत्री यांच्यात मात्र समन्वय नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी मात्र माध्यमांशी बोलताना कोरोना मास्क वापरण्याबद्दल 'मस्ट' शब्द वापरला असला तरी त्याचा अर्थ 'बंधनकारक' असा नाही, असं म्हणत आरोग्य सचिवांच्या आदेशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

राजेश टोपे यांनी या निर्णयावर बोलताना पुण्यात म्हटलं की, राज्यातील काही जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. त्यासाठी टास्क फोर्सच्या बैठकीत बंदिस्त ठिकाणी मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले. याचा अर्थ या ठिकाणी मास्कची सक्ती आहे असे नाही. इंग्रजीमध्ये Must शब्द वापरलेला असला तरी त्याचा अर्थ बंधनकारक नाही. ते आवाहन आहे. मीडियाने सक्ती असा त्याचा अर्थ घेऊ नये.

राजेश टोपे म्हणाले की, मास्क बाबतीत पुढील पंधरा दिवसांत निर्णय घेण्यात येईल. रुग्णांची संख्या, त्यांना लागणाऱ्या उपचारांची गरज हे पाहून मास्क सक्ती करायची का हे ठरवलं जाईल. रुग्णसंख्या काही ठिकाणी वाढत असली तरी उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या नगण्य आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, शुक्रवारी शहरात करोनाचे ७६३ नवे रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंता आहे. पण यावर कोणीही घाबरून न जाता आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि मास्कचा वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कोविड -१९ चाचण्यांची संख्या सध्याच्या आठ हजार चाचण्यांवरून ३०,००० पेक्षा जास्त करावी. सध्या संसर्गाचे प्रमाण आठ टक्क्यांवर पोहोचले आहे. जो धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे पालिका अलर्टमोडवर आहे. अशात नागरिकांनीही आपली काळजी घेणं महत्त्वाचं आहे.



हेही वाचा

मुंबईत एका दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत 46 टक्क्यांची वाढ

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा