जुने ठाणे आणि घोडबंदर परिसरात पाणीटंचाई

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

नवे ठाणे (new thane) अशी ओळख असलेल्या घोडबंदर (ghodbandar) भागातील रहिवाशांनी पाणी टंचाई समस्येचा पाढा काही दिवसांपुर्वीच पालिका प्रशासनापुढेे मांडला होता. त्यापाठोपाठ बुधवारी जुन्या ठाण्यातील धोबीआळी, चरई भागातील रहिवाशांनी पाणी टंचाईच्या समस्येने त्रस्त असल्याचा मुद्दा पालिका प्रशासनासमोर मांडला.

पाणी टंचाईची (water shortage) समस्या लवकरच सोडवा पण तोपर्यंत आम्हाला टँकरने मोफत पाणी पुरवठा करा, अशी मागणीही रहिवाशांनी केली. अखेर येत्या आठवड्याभरात ही समस्या सोडविण्यात येईल, असे आश्वासन पालिका प्रशासनाकडून देण्यात आले.

नवे ठाणे म्हणून घोडबंदर परिसर ओळखला जातो. या भागात मोठमोठी गृहसंकुले उभी राहीली आहेत. आजही याठिकाणी गृहसंकुले उभारणीची कामे सुरू आहेत. वाढत्या शहरीकरणाबरोबरच येथील नागरिकांना विविध समस्या भेडसावत आहेत.

त्यात प्रामुख्याने पाणी आणि वाहतूक कोंडीची समस्येचा समावेश आहे. येथील नागरिकांनी पालिका प्रशासनासोबत काही दिवसांपुर्वी झालेल्या बैठकीत पाणी टंचाई समस्येचा पाढाच वाचला होता.

त्यापाठोपाठ आता जुन्या ठाण्यातील चरई, गोविंद बचाजी रोड, लोकमान्य आळी, जोशी वाडा, धोबीआळी या परिसरातही अशीच समस्या असल्याची बाब समोर आली आहे.

या संदर्भात स्थानिक रहिवाशांकडून प्राप्त होत असलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी बुधवारी ठाणे (thane) महापालिका मुख्यालयात एक बैठक घेतली.

या बैठकीला माजी नगरसेवक सुनैश जोशी, रहिवाशी, पालिकेचे उपनगर अभियंता विनोद पवार हे उपस्थित होते. पाणी पुरवठ्याची वेळ निश्चित नसून कोणत्याही वेळी पाणी पुरवठा होतो. काही वेळेस एक दिवसाआड पाणी पुरवठा होतो.

टँकरने पाणी विकत घ्यावे लागते, अशा समस्या स्थानिक रहिवाशांनी मांडल्या. तसेच पाणी टंचाईची समस्या लवकरच सोडवा पण, तोपर्यंत आम्हाला टँकरने मोफत पाणी पुरवठा करा, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, या भागाकरिता सिद्धेश्वर आणि जेल तलाव जलकुंभावरील वाढीव पाणी देण्यासाठी जलजोडणीचे काम हाती घेण्यात आले असून आठ दिवसांत हे काम पुर्ण होईल.

त्यामुळे येत्या आठ दिवसांत या भागातील पाणी समस्या सुटेल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी यावेळी दिले. तसेच पाणी समस्या सुटत नाही, तोपर्यंत टँकरने विनामुल्य पाणी देण्याचेही अधिकाऱ्यांनी मान्य केेले.

तसेच या भागासाठी सिद्धेश्वर तलाव परिसरात जलकुंभ उभारणीचे काम सुरू असून त्याचे काम पुर्ण होण्यासाठी आठ महिन्यांचा काळ लागणार आहे. हे काम पुर्ण झाल्यावर या जलकुंभातूनही चरई भागाला वाढीव पाणी मिळेल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

ठाण्यातील चरई, गोविंद बचाजी रोड, लोकमान्य आळी, जोशी वाडा, धोबीआळी या परिसरात चार महिन्यांपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. या भागात दीड लाख नागरिक राहतात.

या नागरिकांना टँकरने पाणी घ्यावे लागते. त्यामुळे पालिका पाणी पूरवठा अधिकारी, माजी नगरसेवक आणि स्थानिक रहिवाशी अशी बैठक घेण्यात आली.


पुढील बातमी
इतर बातम्या