गुड न्यूज! सर्वसामान्यांसाठी रेल्वेची 'जनथाळी', फक्त २० रुपयांत जेवण

(File Image)
(File Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

रेल्वेच्या सामान्य डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अल्पदरात जेवण उपलब्ध व्हावे, यासाठी भारतीय रेल्वेने ‘जनथाळी’ देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मुंबई सेंट्रल स्थानकात ही ‘जनथाळी’ उपलब्ध होणार आहे. २० रुपयांत पुरी भाजी आणि ५० रुपयांच्या थाळीमध्ये सीलबंद पाण्यासह संपूर्ण जेवण असे या थाळीचे स्वरूप आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळू शकेल.

रेल्वे फलाटावर लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या सामान्य डब्यांजवळ आयआरसीटीसीच्या माध्यमातून रेल्वे कर्मचाऱ्यांना स्टॉल उभारून थाळीची विक्री करण्याच्या सूचना रेल्वे मंडळाने सर्व क्षेत्रीय रेल्वेला दिल्या आहेत.

‘इकॉनॉमिकल’ आणि ‘अफोर्डेबल’ मिल अशा स्वरूपात ही जनथाळी असणार आहे. ‘इकॉनॉमिकल’ थाळीमध्ये २० रुपयांत ७ पुऱ्या, बटाट्याची भाजी आणि लोणचे असे पाकिट देण्यात येणार आहे.

भात-राजमा/छोले भात, खिचडी, कुलचे/ भटूरे-छोले, पाव भाजी / मसाला डोसा असे पर्याय ५० रुपयांच्या ‘अफोर्डेबल’ मिलमध्ये असणार आहेत. त्याबरोबर २०० मिलीलीटरचे सीलबंद पिण्याचे पाणी देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त १५ रुपयांत एक लीटर रेलनीर हे बाटलीबंद पाणी सर्व रेल्वेस्थानकांत उपलब्ध असणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकमान्य टिळक टर्मिनससह मुंबई सेंट्रल, भुसावळ, पुणे, नागपूर, मनमाड, खांडवा या स्थानकात ही ‘जनथाळी’ उपलब्ध होणार आहे. आयआरसीटीच्या जनआहार केंद्रात तसेच उपाहारगृहात नाश्ता आणि जेवण बनवण्यात येणार आहेत. देशातील ६४ रेल्वे विभागांतील ६४ रेल्वे स्थानकांत ‘जनथाळी योजना’ प्रायोगिक तत्वावर सहा महिन्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.


हेही वाचा

गुड न्यूज! नवी मुंबई विमानतळ 2024 मध्ये सुरू होईल : देवेंद्र फडणवीस

आता मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळा डबा

पुढील बातमी
इतर बातम्या