रमेश पोवारवर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या हंगामी प्रशिक्षकाची जबाबदारी

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रिकेट

भारताचा माजी अाॅफस्पिनर रमेश पोवार हा मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत सर्वात सरस उमेदवार असताना केवळ एमसीएशी खटके उडाल्यामुळे त्याला डावलण्यात अालं. मात्र अाता रमेश पोवारला भारतीय महिला क्रिकेट संघाचं प्रशिक्षकपद भूषविण्याची संधी मिळाली अाहे. मात्र नुकताच महिला संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिलेल्या तुषार अारोठे यांच्या जागी योग्य प्रशिक्षक मिळेपर्यंतच रमेश पोवारला ही जबाबदारी पार पाडावी लागणार अाहे.

सराव शिबिरात सहभागी होणार

भारतीय महिला क्रिकेट संघाचं सराव शिबिर २५ जुलै ते ३ अाॅगस्टदरम्यान बंगळुरू इथं सुरू होत असून या शिबिरात पोवार सहभागी होणार अाहे. माझ्यावर जी हंगामी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात अाली अाहे, त्यामुळे मी अानंदी अाहे. अाता महिला क्रिकेटला पुढे नेण्यासाठी मी प्रयत्न करणार अाहे, असं रमेश पोवारनं सांगितलं.

मुंबईच्या प्रशिक्षकपदाची हुलकावणी

४० वर्षीय रमेश पोवार अाणि मुंबईचा माजी यष्टीरक्षक विनायक सामंत हे मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत होते. मात्र वांद्रे-कुर्ला संकुलातील एमसीए अकादमीच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर रमेश पोवारने एमसीएच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. त्यामुळेच सर्वात सक्षम उमेदवार असूनही मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी पोवारएेवजी विनायक सामंतची निवड करण्यात अाली.

रमेश पोवारची कारकीर्द

रमेश पोवारने दोन कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केलं असून त्याने सहा विकेट्स मिळवल्या अाहेत. तर ३१ वनडेत त्याने ३४ विकेट्स घेतल्या अाहेत. त्याने १४८ प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांमध्ये ४७० बळी टिपले अाहेत.


हेही वाचा -

विनायक सामंत बनला मुंबईचा प्रशिक्षक!

भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदावरून तुषार अारोठे पायउतार


पुढील बातमी
इतर बातम्या