महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन

परदेशात भारताच्या विजयाची पताका रोवणारे भारताचे महान क्रिकेटपटू अजित लक्ष्मण वाडेकर यांचं बुधवारी रात्री निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून अजित वाडेकर कर्करोगाच्या आजाराने त्रस्त होते. मुंबईच्या जसलोक रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७७ वर्षांचे होते. अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९७१मध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यात विजय मिळवण्याची करामत केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक कन्या असा परिवार आहे. वाडेकर यांना १९६७ मध्ये अर्जुन पुरस्काराने तर १९७२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. वाडेकर यांच्यावर शुक्रवारी सकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

स्लिपमधील उत्तम क्षेत्ररक्षक

१९५८-५९ मध्ये बॉम्बे (आताचा मुंबई) संघातून त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर डिसेंबर १९६६मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. १९६६ ते १९७४ या काळात त्यांनी भारतीय संघाकडून ३७ कसोटी सामने खेळताना २११३ धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणारे वाडेकर हे स्लिपमधील एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून ओळखले जायचे. सुनील गावस्कर, गुंडाप्पा विश्वनाथ, फारूख इंजिनियर, बिशन सिंग बेदी, ईरापल्ली प्रसन्ना, भागवत चंद्रशेखर यांसारख्या महान क्रिकेटपटूंचा समावेश असलेल्या भारतीय संघाचं नेतृत्व त्याकाळी अजित वाडेकर यांनी केलं होतं.

७७व्या वर्षीही मैदानात

अजित वाडेकर यांनी अलीकडेच रंगलेल्या दादर यूनियनविरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यात अजित वाडेकर यांनी शिवाजी पार्क जिमखान्याचं नेतृत्व केलं होतं. वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेल्या वाडेकर यांनी या सामन्यात चोरटी धाव घेऊन सर्वांनाच अचंबित केलं होतं. वाडेकर हे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट सुधार समितीचे अध्यक्षही होते. पण काही दिवसांपूर्वीच प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला होता.

पंतप्रधानांकडून श्रद्धांजली

भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल अजित वाडेकर हे सदैव स्मरणात राहतील. एक महान फलंदाज, सर्वोत्तम कर्णधार असलेल्या वाडेकर यांनी आपल्या क्रिकेटच्या इतिहासात संस्मरणीय असे विजय मिळवून दिले. एक प्रशासक म्हणूनही त्यांचा आदर आहे. त्यांच्या जाण्याने अतीव दु:ख झाले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाडेकरांना श्रद्धांजली वाहिली. 


हेही वाचा -

अवघे पाऊणशे वयमान... अजित वाडेकर, माधव अापटे यांनी जिंकली मने


पुढील बातमी
इतर बातम्या