सर्फराझ खानला करायचीय मुंबई संघात घरवापसी

राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा युवा धडाकेबाज फलंदाज अाणि तीन वर्षांपूर्वी मुंबईला रामराम करून उत्तर प्रदेश संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्फराझ खानला अाता पुन्हा मुंबई संघात घरवापसी करायची अाहे. मुंबई संघात स्थान मिळवण्यासाठी उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनकडून लागणारं ना हरकत प्रमाणपत्र (एनअोसी) सर्फराझ खाननं मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे सुपूर्द केलं अाहे.

तीन वर्षांपूर्वी ठोकला रामराम

मुंबई रणजी संघात निवड होण्याची शक्यता कमी असल्यामुळे सर्फराझने तीन वर्षांपूर्वी मुंबईला रामराम ठोकत उत्तर प्रदेश संघातून खेळण्याचा निर्णय घेतला होता. उत्तर प्रदेश संघातून खेळताना मोजक्याच सामन्यात खेळण्याची संधी मिळाल्यानंतर सर्फराझ खानला दुखापतीला सामोरे जावं लागलं होतं. त्यामुळे २०१७ च्या मोसमात तो अायपीएलला मुकला होता.

बंगळुरूनं केलं रिटेन

राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं अायपीएलच्या ११व्या मोसमासाठी कर्णधार विराट कोहली, एबी डीव्हिलियर्ससह सर्फराझ खानला रिटेन केल्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. खुद्द सर्फराझ खानसाठी हा निर्णय विस्मयकारक होता. मात्र सात सामन्यांत संधी मिळूनही त्याला बंगळुरूच्या विश्वासाला पात्र ठरता अालं नाही. त्याला अवघ्या ५१ धावा करता अाल्या.

सेनादलाची होती अाॅफर

मुंबई संघात पुन्हा संधी मिळवायची असेल तर सर्फराझ खानला एमसीएच्या नियमानुसार एका वर्षाचा कूलिंग कालावधी पूर्ण करावा लागेल. सर्फराझ खानसमोर सेनादलाचीही अाॅफर होती. मात्र ही अाॅफर न स्वीकारता त्याने मुंबई क्रिकेटमध्ये घरवापसी करण्याला प्राधान्य दिले अाहे.


हेही वाचा -

२०१९ वर्ल्डकपनंतर डेल स्टेनची वनडेतून निवृत्ती!

स्मृती मंधानाची सर्वात वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाशी बरोबरी


पुढील बातमी
इतर बातम्या