आयसीसीच्या चौकशीनंतर बीसीसीआय घेणार राॅबिन माॅरिसचा निर्णय

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रिकेट

अल जजिरा या वृत्तवाहिनीनं केलेल्या स्टिंग अाॅपरेशनमध्ये भारताच्या तीन कसोटी सामन्यात फिक्सिंग केल्याचा अारोप करण्यात अाला अाहे. या मॅचफिक्सिंगमध्ये मुंबईचा माजी क्रिकेटपटू राॅबिन माॅरिस याचा हात असल्याचे या डाॅक्युमेंटरीमध्ये दिसल्यानंतर अाता बीसीसीअायवर दबाव येऊ लागला अाहे. मात्र या प्रकरणी अांतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (अायसीसी) चौकशी पूर्ण केल्यानंतर जर राॅबिन माॅरिस दोषी अाढळला, तरच त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा पवित्रा बीसीसीअायनं घेतला अाहे.

बीसीसीअायकडून मिळते पेन्शन

इंडियन क्रिकेट लीगमध्ये खेळलेल्या राॅबिन माॅरिसचा सध्या बीसीसीअायच्या कोणत्याही योजनेत समावेश नाही. मात्र माॅरिसला बीसीसीअायकडून २२,५०० रुपये (कर वजा करून) पेन्शन दिली जात अाहे. जर माॅरिस दोषी अाढळला तर त्याची पेन्शन बंद करण्यात येईल, असं बीसीसीअायच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यानं सांगितलं.

कोण अाहे राॅबिन माॅरिस?

राॅबिन माॅरिस हा अांतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू घडविणाऱ्या शारदाश्रम शाळेचा विद्यार्थी. तसंच रमाकांत अाचरेकर यांचा शिष्य. मुंबईकडून रणजी क्रिकेट खेळणारा माॅरिस ३१व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. मात्र त्याअाधी त्यानं वादग्रस्त ठरलेल्या इंडियन क्रिकेट लीगमध्ये प्रतिनिधित्व केलं होतं.

काय म्हणतात माॅरिसचे मित्र...

एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अाणि भारत पेट्रोलियममधली सुरक्षित नोकरी सोडणारा माॅरिस अचानक इतका श्रीमंत कसा झाला, याचं कोडं त्याच्या मित्रांनाही सुटलेलं नाही. 

"स्थानिक क्रिकेट अाणि अायसीएल खेळून कुणाचं नशिब इतकं फळफळणार नाही, हे मी पैज लावून सांगतो. गेल्या काही वर्षात त्याची लाइफस्टाइल पूर्ण बदलली. मर्सिडिझ बेन्झ, महागडी घड्याळं, हे सगळं त्यानं कसं कमावलं, देवास ठाऊक," असं एक मित्र म्हणाला.

दुसऱ्या मित्रानं सांगितलं की, "काही मित्र त्याच्यापासून चार हात लांबच राहत होते. त्याच्या सततच्या दुबईवाऱ्या याच संशयास्पद होत्या."


हेही वाचा -

'डी कंपनी'नं केल्या भारताच्या ३ टेस्ट मॅच फिक्स?

फिक्सिंगची सर्वाधिक गाजलेली 5 प्रकरणं...

पुढील बातमी
इतर बातम्या