भारतीय संघ पुन्हा पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणार?

जगातील सर्व क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मागील काही वर्षांपासून बंद असलेले भारत व पाकिस्तान यांच्यातील सामने आता पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. राजकीय संबंधांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका झाल्या नाहीत. हे दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या स्पर्धेत एकमेकांविरुद्ध लढत होते. पण आता पुन्हा एकदा दोन्ही देशातील क्रिकेट सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी अनुकुल वातावरण तयार होत आहे.

पाकिस्तानमधील एका वृत्तपत्रानं केलेल्या दाव्यानुसार या दोन्ही देशात पुन्हा एकदा क्रिकेट सुरू होऊ शकते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं देशातील सरकारच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा केली आहे. नियोजित योजनेनुसार जर सर्व काही ठीक झाले तर यावर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका होऊ शकते. पाकिस्तानमधील आघाडीचे उर्दू वृत्तपत्र असलेल्या 'डेली जंग'नं याबाबतचे वृत्त दिले आहे. 

दहशतवादाच्या मुद्द्यावर दोन्ही देशातील संबंध बिघडले आहेत. त्यामुळेच जवळ जवळ १० वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने झाले नाहीत. या दोन्ही देशात २००७ साली अखेरची द्विपक्षीय मालिका झाली होती. तेव्हा पाकिस्तानने पाच वनडे आणि तीन कसोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौरा केला होता. पण २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध बिघडले. 

पाकिस्तान संघ २०१२-१३ साली मर्यादित षटकाची छोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला होता. पण दहशतवादी हल्ल्यानं संबंध पुन्हा बिघडले. दरम्यान सर्व काही ठीक झाले तर या वर्षी दोन्ही संघात ३ सामन्यांची टी-२० मालिका होऊ शकते. या वर्षाच्या दुसऱ्या सत्रात ही मालिका खेळवण्याचा विचार असल्याचे वृत्तात म्हटले आहे.


हेही वाचा -

मुंबईत कोरोनाचा उद्रेक, बुधवारी ५ हजार नवे रुग्ण

मुंबईत यापुढे देशी झाडांचीच लागवड होणार

पुढील बातमी
इतर बातम्या