कसोटीतून 'टाॅस' होणार हद्दपार?

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रिकेट

कोणत्याही क्रिकेट सामन्यात 'टाॅस' म्हणजेच नाणेफेकीची भूमिका महत्त्वपूर्ण असते. नाणेफेक जिंकून प्रतिस्पर्धी संघाच्या मजबूत दुव्यांवर मात करण्याची प्रत्येक संघाची इच्छा असते. १८७७ पासून कसोटी सामन्यात नाणेफेक करण्याचा सिलसिला सुरू झाला, तो अाजतागायत कायम अाहे. घरच्या संघाने नाणेफेकीसाठी नाणे उडवायचे अाणि पाहुण्या कर्णधाराने 'छापा' किंवा 'काटा' बोलायचे, ही परंपरा अाजही सुरू अाहे. मात्र अाता कसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याची चिन्हं दिसू लागली अाहेत.

अांतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (अायसीसी) कसोटी क्रिकेटमध्ये अामूलाग्र बदल करण्यासाठी अनेक बदल करण्याचं ठरवलं अाहे. त्यातच पाहुण्या संघाला प्रथम फलंदाजी अथवा गोलंदाजी करण्याची संधी मिळावी, यासाठी अायसीसीनं नाणेफेक बंद करणअयाचा निर्णय घेतला अाहे. या निर्णयामुळे अापल्या क्षमतेनुसार खेळपट्टी तयार करावी, याची संधी मिळणार नाही.

कधी होणार निर्णय?

मुंबईत २८ अाणि २९ मे रोजी होणाऱ्या अायसीसीच्या क्रिकेट कमिटीच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अाहे. भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबेळे, अँड्रयू स्ट्राॅस, महेला जयवर्धने, राहुल द्रविड, टीम मे, न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी डेव्हिड व्हाइट, पंच रिचर्ड केटलबोरो, अायसीसीचे प्रमुख सामनाधिकारी रंजन मदुगले, शाॅन पोलाॅक अाणि क्लेअर काॅनर यांचा समावेश असलेली ही क्रिकेट कमिटी नाणेफेक बंद करण्याचा निर्णय घेणार अाहे.

निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून?

२०१६ पासून इंग्लंडच्या कौंटी चॅम्पियनशिपमध्ये नाणेफेकीचा कौल न घेता पाहुण्या कर्णधाराला प्रथम फलंदाजी अथवा गोलंदाजी करण्याचा अधिकार दिला जातो. त्यामुळे कसोटीत नाणेफेक बंद करण्याचा निर्णय अायसीसीने घेतला तर पुढील वर्षीपासून सुरू होणाऱ्या पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल.

कमिटीचं म्हणणं काय?

खेळपट्टी बनवताना मायदेशी संघाचा भरपूर प्रभाव असल्याची गंभीर चिंता व्यक्त करण्यात अाली अाहे. त्यामुळे नाणेफेक बंद करण्याचा विचार अायसीसीच्या क्रिकेट कमिटीने घेतला अाहे. कमिटीतील एका सदस्याचं असंही म्हणणं अाहे की, प्रत्येक सामन्यात पाहुण्या संघाला नाणेफेक जिंकणे बहाल करायला हवे. अन्य सदस्यांनी मात्र अापलं म्हणणं अद्याप मांडलेलं नाही. त्यामुळे मुंबईत होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होणार अाहे.


हेही वाचा -

अायसीसीच्या अध्यक्षपदी 'हा' मराठी माणूस दुसऱ्यांदा विराजमान

लालचंद राजपूत बनले झिम्बाब्वेचे हंगामी प्रशिक्षक

पुढील बातमी
इतर बातम्या