एमसीएच्या मुंबई टी-२० लीगचा पुन्हा फियास्को? दुसऱ्यांदा मागवल्या संघांसाठी निविदा

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • क्रिकेट

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) बहुप्रतिक्षीत टी-२० मुंबई लीगचा फियास्को झाल्यानंतर अाता मुंबईतील या सर्वात श्रीमंत क्रिकेट असोसिएशनने पुन्हा एकदा या लीगच्या अायोजनासाठी कंबर कसली अाहे. पुरस्कर्ते अाणि संघमालकांची जुळवाजुळव करण्यात एमसीए अपयशी ठरल्यामुळे ४ ते ९ जानेवारी २०१८ दरम्यान होणारी ही स्पर्धा कोणतेही कारण न देता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली होती. अाता एमसीएने संघमालकांची चाचपणी करण्यासाठी पुन्हा एकदा निविदा मागवल्या अाहेत. एमसीएने अनेकदा या स्पर्धेच्या अायोजनाचे शिवधनुष्य पेलले होते. पण प्रत्येक वेळी एमसीएच्या स्वप्नांचा चुराडा झाला अाहे. त्यामुळे अाता तरी टी-२० मुंबई लीगच्या अायोजनाचे शिवधनुष्य एमसीएला पेलता येईल? की पुन्हा एकदा एमसीएचा फियास्को होईल, अशी चर्चा अाता रंगू लागली अाहे.

अाता ११ दिवस रंगणार स्पर्धा

यापूर्वी मुंबई क्रिकेट लीगच्या अायोजनाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीअाय) पाच दिवसांची परवानगी दिली होती. मात्र अाता इंडियन प्रीमिअर लीगच्या (अायपीएल) अाधी म्हणजेच ११ ते २१ मार्च २०१८ दरम्यान ही स्पर्धा घेण्याचे एमसीएने ठरवले अाहे. पहिल्या मोसमात सहा संघ टी-२० मुंबई लीगमध्ये खेळणार असून एमसीएने या सहा संघांच्या मालकांचा शोध घेण्यास सुरुवात केली अाहे.

असे असतील संघ

टी-२० मुंबई लीगसाठी या संघांसाठी निविदा मागवण्यात अाल्या अाहेत.

मुंबई उत्तर (मालाड, कांदिवली, बोरीवली अाणि दहिसर या नावाने)

मुंबई उत्तर-पश्चिम (अंधेरी वर्सोवा, जोगेश्वरी अाणि गोरेगाव)

मुंबई उत्तर-पूर्व (घाटकोपर, विक्रोळी, भांडूप अाणि मुलुंड)

मुंबई उत्तर-मध्य (कुर्ला, वांद्रे, सांताक्रूझ अाणि विलेपार्ले)

मुंबई दक्षिण-मध्य (वडाळा, दादर, माहिम, सायन अाणि चेंबूर)

मुंबई दक्षिण (कुलाबा, भायखळा, मलबार हिल अाणि वरळी)

इतक्या संघांवर बोली लावता येईल

इनव्हिटेशन टू बिड (अायटीबी) यानुसार बोली लावणाऱ्याला तीन विविध संघांवर बोली लावता येतील. त्यापैकी सर्वाधिक बोली लावणाऱ्याला संघाचे मालकीहक्क प्रदान केले जातील. यासंबंधीची सर्व कागदपत्रे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वानखेडे स्टेडियममधील कार्यालयात उपलब्ध अाहेत. या निविदा २० फेब्रुवारीपर्यंत एमसीएच्या कार्यालयात स्वीकारल्या जातील.


हेही वाचा -

आता मुंबईची स्वत:ची टी-२० लीग, ४ जानेवारीपासून रंगणार स्पर्धा


पुढील बातमी
इतर बातम्या