बोरीवली-जुहू यांच्यात शनिवारी रंगणार एमएमपीएलच्या ग्रँड फिनालेचा थरार

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • क्रिकेट

साई-मुंबई मास्टर्स प्रीमिअर लीग अाता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली अाहे. ३३ वर्षांखालील क्रिकेटपटूंसाठी असलेल्या या स्पर्धेचा महाअंतिम सामना शनिवारी मरीन ड्राइव्ह येथील पोलीस जिमखान्यावर होणार अाहे. जुहू हिरोज अाणि पॅराडिगम बोरीवली वाॅरियर्स यांच्यात संध्याकाळी ६.३० वाजता ग्रँड फिनालेचा थरार रंगणार अाहे. याअाधी बोरीवली वाॅरियर्सने शिवाजी पार्क सुपरस्टार्सला ३३ धावांनी पराभूत करत अंतिम फेरीत मजल मारली होती. तर जुहू हिरोजने वरळी पिच स्मॅशर्सला पराभवाचा धक्का देत फायनलमध्ये प्रवेश केला होता. अाता गटात अव्वल स्थानी मजल मारणाऱ्या या दोन तगड्या संघांमध्ये विजेतेपदासाठी झुंज रंगणार अाहे.

बोरीवलीचा शाहिन मेस्त्री तुफान फाॅर्मात

बोरीवली वाॅरियर्सने सुरुवातीपासूनच दमदार खेळ करत अापणच विजेतेपदाचे दावेदार अाहोत, हे दाखवून अाहे. बोरीवली वाॅरियर्सने अातापर्यंत फक्त एक सामना गमावला असून लीगमध्ये पाच सामन्यांत विजय मिळवून १० गुणांसह अ गटात अव्वल स्थान पटकावले होते. बोरीवलीच्या या यशात फलंदाज शाहिन मेस्त्रीने मोलाचा वाटा उचलला अाहे. त्याने तीन अर्धशतके अाणि एका शतकासह ३८८ धावा फटकावल्या अाहेत. एमएमपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो अग्रस्थानी अाहे. अाता अंतिम फेरीतही त्याच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा बोरीवली वाॅरियर्सला असेल.

जुहूच्या यशात प्रतिक पाटीलचा वाटा

साई-एमएमपीएलमध्ये पहिलं शतक झळकावण्याचा मान पटकावला तो जुहू हिरोजच्या प्रतिक पाटीलनं. सुरुवातीच्या तीन सामन्यांत २६० हून अधिक धावा फटकावणाऱ्या प्रतिक पाटीलची तोफ काहीशी थंडावली असली तरी अंतिम फेरीत दमदार कामगिरी करण्यासाठी तो सज्ज झाला अाहे. त्याने अातापर्यंत एक शतक अाणि दोन अर्धशतकांसह ३३४ धावा केल्या अाहेत. जुहू हिरोजच्या यशात प्रतिक पाटीलनं मोलाची कामगिरी बजावली अाहे.

पुढील बातमी
इतर बातम्या