Advertisement

बोरीवली वाॅरियर्सची एमएमपीएलमध्ये विजयी घोडदौड कायम


बोरीवली वाॅरियर्सची एमएमपीएलमध्ये विजयी घोडदौड कायम
SHARES

अायपीएलच्या धर्तीवर मरीन ड्राइव्ह येथील पोलीस जिमखान्यावर सुरू असलेल्या साई-मुंबई मास्टर्स प्रीमिअर लीग स्पर्धेत पॅराडिगम बोरीवली वाॅरियर्स संघाने अापली विजयी घोडदौड कायम राखली अाहे. गुरुवारी संध्याकाळी रंगलेल्या पहिल्या सामन्यात बोरीवली वाॅरियर्सने वरळी पिच स्मॅशर्सचा ७६ धावांनी पराभव करून सलग दुसऱ्या विजयासह अ गटात ४ गुणांसह अव्वल स्थान पटकावले अाहे. शाहिन मेस्त्री (४८), शबीर माल्कम (नाबाद ३८) यांच्या सुरेख फलंदाजीमुळे बोरीवली वाॅरियर्सने १७ षटकांत ५ बाद १७८ धावा फटकावल्या. हे उद्दिष्ट गाठताना वरळी पिच स्मॅशर्सचा डाव १६.१ षटकांत १०२ धावांवर अाटोपला. राहुल भद्रेश्वरने चार विकेट्स मिळवत बोरीवलीच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. तोच सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.


शाहिन मेस्त्री पुन्हा एकदा चमकला

सुरुवातीलाच दोन हादरे बसल्यानंतर शाहिन मेस्त्रीने बोरीवली वाॅरियर्सचा डाव सावरला. रिशी पिलानी (१) अाणि विनोद एल. (५) हे दोन फलंदाज अवघ्या १५ धावांवर माघारी परतले असताना शाहिनने निकेत कोरगावकरसह ६५ धावांची भागीदारी रचली. शाहिनने ३३ चेंडूंत ८ चौकार अाणि १ षटकारासह ४८ धावा फटकावल्या. निकेत (३६), शबीर माल्कम (३८) अाणि लवेश मिश्रा (२९) यांनी अाक्रमक फलंदाजी करत अापल्या संघाला ५ बाद १७८ अशा स्थितीत अाणून ठेवले.


राहुलच्या भेदक माऱ्यापुढे वरळीची शरणागती

बोरीवली वाॅरियर्सचे १७९ धावांचे लक्ष्य पार करताना वरळी पिच स्मॅशर्सच्या डावाला राहुल भद्रेश्वर याने सुरुवातीपासूनच खिंडार पाडले. राहुलने पहिल्या चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवल्यामुळे वरळीची स्थिती ४ बाद ३६ अशी झाली होती. या धक्क्यातून वरळीचा डाव सावरलाच नाही अाणि त्यांचा डाव अवघ्या १०२ धावांवर संपुष्टात अाल्याने बोरीवलीने ७६ धावांनी विजय मिळवला.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा