एसपीजी टी-२० स्पर्धेत पय्याडे क्लब अजिंक्य

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रिकेट

गतउपविजेत्या पय्याडे क्रिकेट क्लबनं या वर्षी मात्र मुंबई पोलीस जिमखान्याचा ६ विकेट्सनी धुव्वा उडवून विजय मांजरेकर व रमाकांत देसाई स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावलं. अंतिम सामन्यात सलामीवीर हर्ष टंक (४६ धावा) व प्रसाद पवार (नाबाद ३९ धावा) यांच्या चौकार-षटकारांच्या आतषबाजीमुळे पय्याडे क्रिकेट क्लबने यंदा प्रथमच विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी पय्याडे स्पोर्टस क्लबच्या विजयाचा घास नॅशनल क्रिकेट क्लबच्या खेळाडूंनी अवघ्या दोन धावांच्या फरकानं हिरावून घेतला होता.

पय्याडेच्या गोलंदाजांची प्रभावी कामगिरी

मुंबई पोलीस जिमखान्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तरी त्यांचे दोन्ही सलामीवर अवघ्या १९ धावांतच तंबूत परतले. श्रीकांत लिंबोले (३१ धावा), शशिकांत कदम (२५ धावा) यांनी मुंबई पोलिसांचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण कल्पेश सावंत, दीपक शेट्टी यांनी पुन्हा एकदा मुंबई पोलिसांना हादरे दिले. पय्याडेच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केल्यामुळे मुंबई पोलिसांना २० षटकांत ७ बाद ११५ धावाच करता अाल्या.

हर्ष-प्रसादची मोलाची भागीदारी

केविन अल्मेडाने पय्याडेला सुरेख सुरुवात करून दिली तरी चौथ्या षटकांत त्यांची अवस्था २ बाद २६ अशी झाली होती. अखेर हर्ष टंक अाणि प्रसाद पवार यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी रचत पय्याडेला विजयासमीप अाणून ठेवले. अखेर पय्याडे क्लबने १५ षटकांत हे अाव्हान पार करून अंतिम विजेतेपदाला गवसणी घातली. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार हर्ष टंकने (पय्याडे) पटकावला. मुंबई पोलिसांचे जय बिश्त अाणि संतोष शिंदे यांनी अनुक्रमे सर्वोत्तम फलंदाज अाणि सर्वोत्तम गोलंदाजाचे बक्षिस मिळवले. विजेत्यांना माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते गौरवण्यात अाले.


हेही वाचा -

शिवाजी पार्क जिमखान्यावर मुख्यमंत्र्यांची बॅटिंग...

पुढील बातमी
इतर बातम्या