रमेश पोवार बनला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी माजी अाॅफस्पिनर रमेश पोवार याची नियुक्ती करण्यात अाली अाहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये कॅरेबियन बेटांवर होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेपर्यंत तो भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी असेल, असे बीसीसीअायने अाज जाहीर केले. गेल्या महिन्यात तुषार अारोठे यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर रमेश पोवार याची हंगामी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात अाली होती. पोवार अाता बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकॅडमीत होणाऱ्या महिला संघाच्या सराव शिबिरात सामील होईल. त्याच्या कार्यकाळात भारतीय संघ सप्टेंबर महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाईल तसेच अाॅक्टोबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका खेळेल.

रमेश पोवारने २००४ ते २००७ या कालावधीत ३१ वनडे, २ कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले असून त्याने ३४ विकेट्स मिळवल्या अाहेत.

अनुभव नसतानाही जबाबदारी

प्रशिक्षणाचा कोणताही अनुभव गाठीशी नसलेल्या रमेश पोवारने नुकताच अाॅस्ट्रेलियात जाऊन लेव्हल-३ अभ्यासक्रम पूर्ण केला होता. महिला संघासाठी पूर्णवेळ प्रशिक्षक नेमण्यासाठी कमी वेळ असल्यामुळे अाणि पोवारव्यतिरिक्त कोणताही पर्याय दिसत नसल्यामुळे बीसीसीअायच्या प्रशासकीय समितीने अखेर रमेश पोवारची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला.


हेही वाचा -

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाच्या शर्यतीत २० जण

रमेश पोवारवर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या हंगामी प्रशिक्षकाची जबाबदारी


पुढील बातमी
इतर बातम्या