श्रेयस अय्यरला दुखापत, वन डे मालिकेतून बाहेर

टीम इंडियामधील महत्त्वाचा खेळाडू असलेल्या श्रेयस अय्यरला इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे श्रेयस एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील बाकीचे दोन सामने खेळणार नाही.

इंग्लंडचा संघ फलंदाजी करत असताना आठव्या षटकांत श्रेयसला दुखापत झाली. शार्दूल ठाकूरच्या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर एक वेगवान बॉल रोखण्याचा प्रयत्न श्रेयस करत होता. चेंडू त्याच्या डाव्या खांद्याला जोरात लागला. दुखापतीमुळे तो मैदानाबाहेर गेला आणि राखीव खेळाडू मैदानात आला. सामना संपेपर्यंत श्रेयस मैदानात परतला नाही. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील बाकीचे दोन सामने तो खेळणार नाही. यामुळे श्रेयसच्या ऐवजी संघात सूर्यकुमार यादव याला संधी देण्यात येईल अशी चर्चा आहे.

श्रेयसवर शस्त्रक्रिया केली जाणार असून या शस्त्रक्रियेनंतर त्याला पूर्ण बरे होण्यास वेळ लागेल. दुखापतीतून सावरण्यास आणखी वेळ लागल्यास ९ एप्रिलपासून सुरू  होणाऱ्या आयपीएलमध्येही श्रेयस न खेळण्याची शक्यता आहे.

श्रेयस अय्यर हा दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार आणि प्रमुख फलंदाज आहे. तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही तर हा दिल्ली कॅपिटल्स संघासाठी मोठा धक्का ठरण्याची शक्यता आहे.

पुणे येथे खेळवण्यात आलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडवर ६६ धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी ३१८ धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडचा डाव २५१ धावांवर आटोपला. 

हेही वाचा -

  1. भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय
पुढील बातमी
इतर बातम्या