पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडवर ६६ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. प्रसिध कृष्णन आणि शार्दुल ठाकूर हे युवा वेगवान गोलंदाज प्रत्येकी तीन विकेट्स मिळवत या विजयाचे शिल्पकार ठरले.
तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना पुणे येथे मंगळवारी झाला. भारताने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडपुढे ३१८ धावांचे आव्हान ठेवलं होतं. इंग्लंडचा संघ २५१ धावांवर सर्वबाद झाला. भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने दमदार सुरुवात केली. जॉनी बेअरस्टोने आक्रमक तर, जेसन रॉयने सावध पवित्रा धारण करत संघाचे ७ व्या षटकात अर्धशतक पूर्ण केले. पण त्यानंतर प्रसिधने पदार्पण करताना भारताला पहिले यश मिळवून दिले. प्रसिधने यावेळी जेसन रॉयला ४६ धावांवर बाद केले आणि इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर प्रसिधने बेन स्टोक्स आणि सॅम बिलिंग्स यांना माघारी धाडलं.
शार्दुलने स्थिरस्थावर झालेल्या बेअरस्टोला बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. बेअरस्टोने यावेळी ९४ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्यानंतर शार्दुलने कर्णधार इऑन मॉर्गन आणि जोस बटलर यांना बाद केलं आणि भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला.
भारताकडून शिखर धवनने सर्वाधिक ९८ धावा केल्या. त्याचे शतक फक्त दोन धावांनी हुकले. भारताच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी केली. सलामीच्या जोडीने अर्धशतकी भागिदारी केली. १६ व्या षटकात बेन स्टोक्सने रोहित शर्माला २८ धावांवर बाद केले आणि भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने शिखर सोबत तिसऱ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली. विराट कोहली ५६ धावा करुन बाद झाला.
त्यानंतर आलेला श्रेयस अय्यर ६ धावांची भर घालून वूडच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. सामन्याच्या ३९ व्या शतकात धवनला शतकाने हुलकावणी दिली. स्टोक्सला फटका खेळताना धवन ९८ धावांवर झेलबाद झाला. वनडे पदार्पण केलेला कृणाल पंड्या संघासाठी धावून आला. पदार्पणाच्या सामन्यात कृणालने दमदार अर्धशतक ठोकले. कृणालनंतर राहुलनेही फॉर्ममध्ये येत आपले अर्धशतक पूर्ण केले. कृणालने ३१ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ५८ तर, राहुलने ४३ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ६२ धावा केल्या.