
मुंबईतील (mumbai) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (CSMIA) प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या टॅक्सी व ऑटो रिक्षा चालकांवर (Taxi and auto drivers) सहार पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
परदेशी प्रवाशांची फसवणूक करून त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा रक्कम घेणाऱ्या चालकांविरूद्ध खंडणी आणि फसवणुकीचे (cheating) गुन्हे दाखल केले आहे. याप्रकरणासंबंधित गेल्या दोन महिन्यात 80 एफआयआर दाखल केल्या आहेत.
सहार पोलिसांनी 13 टॅक्सी आणि रिक्षा चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
तसेच 13 टॅक्सी जप्त करून अनेक चालकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. सहार पोलिसांकडे अशा दोन तक्रारी आल्यानंतर त्यांनी ही कठोर कारवाई सुरू केली.
प्रवाशांना या टॅक्सी चालकांनी प्रवासाच्या मध्येच वाढीव भाड्याची मागणी केली होती. नकार देताच प्रवाशांना धमकी देत त्यांच्यावर दादागिरी केल्याची या प्रवाशांनी तक्रार केली होती.
2 मार्चला घडलेल्या घटनेत एका 28 वर्षीय व्यावसायिकाची फसवणूक करून त्याच्याकडून अधिक भाडं उकळण्याचा प्रयत्न केला. हा व्यावसायिक भुवनेश्वरवरून पहाटे 1.30 वाजता विमानतळावर दाखल झाला होता.
सुरक्षा रक्षकाशी बोलताना रिक्षावाल्याने त्याला सेवन हिल्स रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी मीटरनुसार भाडं घेणार असं मान्य केलं. पण प्रवाशाकडून नंतर 500 रुपयांची मागणी करत पैसे देण्यास नकार दिल्यास मारण्याची धमकी दिली.
प्रवाशाने नंतर तक्रार नोंदवली असून रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे. प्रकाश शेट्टी (42) या रिक्षाचालकाचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
यापूर्वी पहिली एफआयआर (FIR) 25 फेब्रुवारी रोजी नोंदवण्यात आली होती. एका महिला पोलिस आधिकाऱ्यांनी प्रवासी असल्याचं भासवत कुलाब्यासाठी टॅक्सीने प्रवास करण्याचा प्रयत्न केला. पण या टॅक्सी चालकाने अधिकाऱ्यांकडून 1700 रुपयांची मागणी केली.
सहार पोलिसांनी वैभव भोसले (34) या टॅक्सी चालकाला या प्रकरणात अटक केली आहे. एआसआय स्मिता पेडणेकर टॅक्सीमध्ये बसल्यावर त्यांना धमकी द्यायला सुरूवात केली.
आरडाओरडो केला तर अजून 350 रुपये द्यावे लागतील अशीही धमकी टॅक्सी चालकाने त्यांना दिली. या दोन प्रकरणानंतर पोलिसांनी ही कारवाई सुरू केली होती.
दरम्यान, जानेवारी महिन्यातही असाच एक प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. फक्त 400 मीटर अंतरासाठी एका टॅक्सी चालकाने परदेशी प्रवाशाकडून तब्बल 18000 रुपये भाडं आकरलं होतं.
टॅक्सी आणि रिक्षाचालकांच्या या मनमानीवर आळा घालण्यासाठी ही कारवाई सुरू केली.
हेही वाचा
