दिव्यांगांच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत दक्षिण विभागाची बाजी

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रिकेट

पूर्ण स्पर्धेत धमाकेदार खेळ करणाऱ्या यजमान पश्चिम विभागाच्या फलंदाजांनी विजेतेपदाच्या लढतीतच नांगी टाकल्यामुळे दक्षिण विभागाला आठव्या एलआयसी कप आंतरविभागीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावता अाले. पश्चिम विभागाच्या फलंदाजांची निराशाजनक कामगिरी हीच दक्षिण विभागाच्या पथ्यावर पडली. नरेंदरच्या आक्रमक आणि सातत्यपूर्ण फलंदाजीमुळे दक्षिण विभागाने पश्चिम विभागावर ६ विकेट्सनी मात करत जेतेपदावर नाव कोरले.

पश्चिमेच्या फलंदाजांनी केली निराशा

नॅशनल क्रिकेट क्लबच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या यजमान पश्चिम विभागाच्या फलंदाजांनी घोर निराशा केली. सुरुवातीचे तीन फलंदाज लवकर माघारी परतल्यामुळे पश्चिम विभागाची अवस्था ३ बाद १३ अशी झाली होती. त्यानंतर असित जैसवारने कुणाल पानसेसह संघाची पडझड रोखली. दोघांनी ५१ धावांची भागीदारी रचली. कुणाल २८ धावांवर पायचीत झाल्यानंतर सौरभने आणखी दोन छोट्या भागीदाऱ्या करून संघाला ११८ धावांपर्यंत नेले.

नरेंदरची जबरदस्त खेळी

नरेंदरने अंतिम सामन्यातही ३९ चेंडूंत ५४ धावांची अफलातून खेळी करीत संघाचे जेतेपद जवळजवळ निश्चित केले. नरेंदरने सलग तीन वेळा ३० पेक्षा अधिक धावांच्या भागीदाऱया करून संघाला विजयासमीप नेले. नरेंदर १२ व्या षटकांत बाद झाल्यानंतर सुगणेशने अष्टपैलू चमक दाखवली. त्याने १५ चेंडूंत नाबाद २९ धावा ठोकत संघाच्या विजेतेपदावरही शिक्कामोर्तब केले. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान दक्षिण विभागाच्या अष्टपैलू सुगणेशने मिळविला. स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज पश्चिम विभागाचा रोहन वाघेला तर दक्षिण विभागाचा फलंदाज नरेंदर ठरला.

पुढील बातमी
इतर बातम्या