पीएमसी बँक घोटाळा: हितेंद्र ठाकूर यांचा पुतण्या, सीएला अटक

पंजाब अँड महाराष्ट्र को आॅप (pmc bank) बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत यांच्याशी ठाकूर कुटुंबीयाचे आर्थिक संबंध असल्याच्या संशयावरून शनिवारी सकाळी अंमलबजावणी संचलनालयाने (ED) बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचा पुतण्या आणि विवा ग्रुपचा संचालक मेहुल ठाकूर तसंच सीए मदन चतुर्वेदी यांना अटक केली आहे. 

पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत यांच्याशी हितेंद्र ठाकूर यांचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे. पीएमसी घोटाळ्यात ५ ते ६ कोटींचं मनी लॉन्ड्रिंग झालं असून त्यातील काही रक्कम विवा संस्थेत गुंतवण्यात आल्याचा संशय ईडीच्या अधिकाऱ्यांना आहे. 

हेही वाचा- PMC बँक घोटाळाः ईडीचा आमदार हितेंद्र ठाकूरांच्या ६ ठिकाणांवर छापा

त्यानुसार ईडीने विवा ग्रुपच्या वसई-विरारसह मीरा भाईंदर परिसरातील ६ कार्यालयांवर धाडी टाकल्या असून यात काही महत्त्वाची कागदपत्रे ईडीच्या हाती लागली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. विवा ग्रुपशी संबंधित ठिकाणांची झाडाझडती अजूनही सुरूच असल्याचं समजतं.

प्रवीण राऊत हा एचडीआयलची उपकंपनी असलेल्या गुरुआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचा माजी संचालक आहे. ईडीच्या माहितीनुसार, प्रवीण राऊत याने ९५ कोटींपैकी १ कोटी ६० लाख रुपये आपल्या पत्नीच्या खात्यावर ट्रान्सफर केले होते. त्यातील ५५ लाख पुढे शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देण्यात आले होते. त्यानुसार वर्षा राऊत यांचीही ईडीने चौकशी केली आहे.  

विवा ग्रुप आणि ग्रुपच्या समूह कंपन्या हितेंद्र ठाकूर यांच्या कुटुंबातील व्यक्तींकडून चालवल्या जातात. २०१९  च्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास अाघाडीमधून राजेश रघुनाथ पाटील, क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर आमदार झाले आहेत. वसई विरार महानगर पालिकेवरही हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास अघाडीची सत्ता आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या