गेल्या काही दिवसांपासून मुंबईत घडत असलेल्या आगीच्या आणि अपघातांच्या घटनांमुळे मुंबईवर कुणाची वक्रदृष्टी आहे की काय? असा प्रश्न कुणा ज्योतिषाला पडला, तर नवल वाटायला नको! आगीच्या घटनांमुळे आधीच चक्रावलेल्या मुंबईकरांना रविवारी सुट्टीच्या दिवशी नवा धक्का बसला. पूर्व द्रुतगती मार्ग अर्थात इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दुपारच्या सुमारास एक अजब अपघात घडला.
विक्रोळीच्या ईस्टर्न फ्रीवेवर एका विचित्र अपघातात ७ गाड्या एकामागोमाग एक धडकल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणही जखमी झालेले नाही. मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळीच्या कन्नमवर नगर परिसरात भरधाव वेगात असलेल्या एका कार चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे मागून वेगात असलेल्या ७ गाड्या एकमेकांना धडकल्या. या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. मात्र, घडलेल्या या विचित्र अपघातामुळे वाहन चालकांचे मोठे नुकसान झाले आहे.
या अपघातामुळे काही वेळ पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. मात्र, वेळीच वाहतूक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची नोंद स्थानिक पोलिसांनी केली असून नेमकी कुणाची चूक आहे? याची तपासणी महामार्ग पोलिस करत आहेत. यासाठी महामार्गावर लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजची मदत पोलिस घेत आहेत.
हेही वाचा