दादरमध्ये आहात? मग मोबाईल सांभाळा!

हा प्रकार रात्री ९ वाजेच्या सुमारास घडला. ज्यावेळी दादर स्टेशन आणि फुटओव्हर ब्रिजवर बरीच वर्दळ असते. त्यामुळे खरंच, रेल्वे स्टेशनवर मुंबईकर सुरक्षित आहेत का? असाच प्रश्न पडला आहे.

दादरमध्ये आहात? मग मोबाईल सांभाळा!
SHARES

हल्ली सर्वच राजकीय पक्ष मुंबईत नाईट लाईफबद्दल बोलताना दिसतात. शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे तर कंठरवाने नाईट लाईफचा पुरस्कार करतात. पण, ही नाईटलाईफ किती सुरक्षित आहे, यावरच मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होण्यासारखी परिस्थिती आहे. नाईट लाईफ तर सोडा, पण रात्री ९-१० वाजताही तुम्ही किती सुरक्षित आहात? याची खात्री कुणीही देऊ शकत नाही. 'मुंबई लाइव्ह'च्या प्रतिनिधीच्याच बाबतीत असा प्रकार घडला आहे.


मोबाईल गेला, पण सुरक्षेचं काय?

मुंबई लाइव्हच्या प्रतिनिधी मानसी बेंडके दादरच्या नवीन फुटओव्हर ब्रिजवर उभ्या असताना एका चोरट्याने त्यांच्या हातातून मोबाईल हिसकून पळ काढला. हा प्रकार रात्री ९ वाजेच्या सुमारास घडला. ज्यावेळी दादर स्टेशन आणि फुटओव्हर ब्रिजवर बरीच वर्दळ असते. त्यामुळे खरंच, रेल्वे स्टेशनवर मुंबईकर सुरक्षित आहेत का? असाच प्रश्न पडला आहे.



भर गर्दीत हिसकला मोबाईल

रात्री साधारण ९च्या सुमारास मानसी बेंडके दादरच्या टिळक ब्रिजवरून फुटओव्हर ब्रिजकडे निघाल्या होत्या. ब्रिजवर येताच प्लॅटफॉर्म नंबर एकच्या दिशेने हा भामटा आला आणि त्याने त्यांच्या हातातून मोबाईल हिसकून घेतला. या भामट्याने त्यानंतर टिळक ब्रिज गाठून थेट खोदादाद सर्कलच्या दिशेने पळ काढला.


पाठलाग ठरला अपयशी

काही कळायच्या आत त्या भामट्याने मोबाईल हिसकून घेतल्यामुळे भांबावलेल्या मानसी यांनी लागलीच भानावर येत त्याचा पाठलाग सुरु केला. मात्र त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. काही अंतरावर एका मुलाने या भामट्याला पकडायचा प्रयत्नही केला. मात्र, त्या मुलाला धक्का देऊन या भामट्याने पळ काढला.



सीसीटीव्हीच नाहीत, सुरक्षा कशी मिळणार?

धक्कादायक बाब म्हणजे, दादरच्या या फुटओव्हर ब्रिजवर थेट दुसऱ्या टोकाला एक सीसीटीव्ही बसवलेला आहे. त्यामुळे या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज कसं मिळणार हा प्रश्न आहे? दादरमधून रात्री उशीरा प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेकडेही या प्रकारामुळे दुर्लक्ष होत असल्याचं समोर आलं आहे.




या भामट्याला पोलिस पकडणार कसं?

ही घटना घडल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. यावेळी, पोलिसांनी आमच्या प्रतिनिधींना मदत केली असली, तरी सीसीटीव्ही फुटेज नसताना या भामट्याला पोलिस कसं पकडणार? हा प्रश्नच आहे. एकूणच, या प्रकारानंतर दादरच काय, पण मुंबईत कुठेही फिरताना सजग रहाणंच मुंबईकरांच्या हिताचं आहे हे नक्की! आणि हे प्रकार कमी होत नाहीत, तोपर्यंत सो कॉल्ड नाईट लाईफच्या गप्पा न मारलेल्याच बऱ्या!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा