अंमलीपदार्थ तस्करांवर पहिल्यांदाच 'मकोका' अंतर्गत कारवाई

मुंबईच्या वाडीबंदर परिसरातील अमली तस्करांवर वचक बसवण्यासाठी डोंगरी पोलिसांनी त्यांच्यावर थेट मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी या ठिकाणाहून ४ नायजेरियन्सना अटक केली होती. अंमली तस्करीत मकोकाअंतर्गत कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे म्हटलं जात आहे.  

नायजेरियन तस्करांचा उच्छाद

मुंबईच्या डोंगरी परिसरात या नायजेरियन तस्करांचा मोठा उच्छाद होता. या नायजेरियन तरुणांवर अनेकदा कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान या तस्करांनी पोलिसांवरही अनेकदा हल्ला चढवला. पोलिसांना दगडानं ठेचून मारण्यापर्यंत या नायजेरियन तरुणांची मजल गेली होती. एका कारवाईत पोलिसांना गोळीबारही करावा लागला होता. कित्येक पोलिस या हल्यात जखमी झाले. हे तस्कर लाखो रुपयांची तस्करी या ठिकाणाहून करत होते. कोकेन, एमडी या घातक अमली पदार्थाची विक्री करत होते. या पार्श्वभूमीवर साहाय्यक आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांनी या तस्करांवर ‘मोकोका’अन्वये कारवाईसाठी पुढाकार घेतला.

‘मोकोका’अन्वये कारवाई

फेब्रुवारी महिन्यात ३ नायजेरियन तरुणांना एमडी विक्री करताना डोंगरी पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणखी एका साथीदारालाही अटक करण्यात आली. यापैकी इक्यू इमॅन्युअल हा या टोळीचा प्रमुख असल्याची माहिती चौकशीतून पुढे आली. त्याच्याविरोधात अलीकडच्या काळात अमली पदार्थ विक्रीचे २ गुन्हे दाखल होते. तसंच त्या गुन्ह्य़ात आरोपपत्रही दाखल करण्यात आलं होतं. ही पार्श्वभूमी ‘मोकोका’अन्वये कारवाई करण्यासाठी पुरेशी असल्याचं लक्षात येताच धर्माधिकारी यांनी वरिष्ठांकडे तसा प्रस्ताव पाठवत. या चारही आरोपींविरोधात ‘मोकोका’ अन्वये गुन्हा नोंदवला. त्यांना ‘मोकोका’ न्यायालयानं २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चालू वर्षात डोंगरी आणि जे.जे. मार्ग पोलिसांनी अमली पदार्थाचं सेवन करणाऱ्या ६२८ जणांना अटक केली.


हेही वाचा -

ताडदेवमध्ये ५० लाखांची रोकड हस्तगत

'राज ठाकरेंनी माझ्या मतदारसंघात सभा घेतल्यास मला आनंदच' – उर्मिला मातोंडकर


पुढील बातमी
इतर बातम्या