मुलाच्या मृतदेहासाठी कुटुंबाकडे २ लाखांची मागणी, चेंबुरचा धक्कादायक प्रकार

परदेशातील लठ्ठ पगाराच्या नोकरीच्या मोहात असाल तर सावधान! परदेशातील नोकरीचे आमिष देऊन गरजू मुलांना अनधिकृत रित्या परदेशात नेत, कामासाठी त्यांना नशेच्या आहारी ढकलत राबवून घेतलं जात असल्याची धक्कादायक बाब घडकीस आली आहे. परदेशात नोकरीसाठी जाणं एका व्यक्तीच्या जिवावरच बेतलं आहे.

नोकरीचं आमिष जिवावर बेतलं

चेंबूरमधील २१ वर्षीय तरुण अशाच नोकरीच्या आमिषाला बळी पडून ८ महिन्यांपूर्वी परदेशात गेला. मात्र, नशेचा ओव्हर डोस झाल्याने त्याचा परदेशातच मृत्यू झाला. आता मुलाचा मृतदेह मिळवण्यासाठी त्याचे कुटुंबिय धडपडत असताना ‘मुलगा हवा असल्यास २ लाख पाठवा, अन्यथा मुलाला विसरा’ असा धमकीचा मेसेज परदेशातील एजंटकडून आल्याने कुटुंबियांच्या पायाखालची जमिनच सरकली आहे.

वडिलांनी काढलं संदीपसाठी कर्ज

मूळचा उस्मानाबादचा असलेला संदीप ब्रम्हदेव चौधरी (२१) आणि त्याचे कुटुंब चेंबुरच्या कोकण नगरच्या जयहिंद चाळीत राहतं. काही दिवसांपूर्वी संदीप त्याच्या एका मित्राच्या घरी गेला होता. तेथे त्याची ओळख विक्रम घाडगे याच्याशी झाली. मूळचा साताऱ्याचा रहिवाशी असलेला विक्रम परदेशात नोकरीला होता. विक्रमच्या लठ्ठ पगाराच्या नोकरीची भुरळ संदीपवर पडली. त्यावेळी संदीप ही नोकरीसाठी परदेशात जाण्यास तयार झाला. परदेशात संदीपला चांगली नोकरी, महिन्याला ५० हजार रुपये पगार मिळत असल्याने संदीपचे वडील ब्रम्हदेव यांनीही कर्ज काढून पैसे जमा केले.

एजंटने केली अनधिकृत रिक्रुटमेंट

बोटीवर कामासाठी लागणारा ‘एचटीसीडब्ल्यू’ हा पंधरा दिवसांचा कोर्स करून पंजाबच्या औतार सिंग एजंटने दोघांची अनधिकृतरित्या रिक्रुटमेंट केली. त्यानुसार संदीप आणि विक्रम जुलै २०१७ मध्ये मलेशियाला गेले. दोन महिने मर्चंट नेव्ही बोटीवर काम केल्यानंतर तेथील कॅप्टनशी त्याचं खटकलं. दोघांनी नोकरी सोडल्यानंतर एजंट औतार सिंगने त्याच्या मलेशियातील एजंट जगदीप सिंगकडे त्यांना पाठवले.

जास्त कामासाठी नशेचे डोस!

जगदीपने या दोघांना मलेशियातील ‘सिबू’ या ठिकणी नेले. मात्र तेथे नोकरीला लावण्यासाठी १ लाख २० हजारांची मागणी केली. त्यानुसार ब्रम्हदेव यांनी पैसे पाठवले. दोघेही ‘सिबू’ येथील ‘चार्ल्स लून्ली’ या ‘शिप’वर कामाला लागले. ही शिप तेथील ‘बिंतापूर पोर्ट’वर अनधिकृतरित्या उभी असल्याने तिच्यावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर जगदीपने दोघांचे फोन उचलणं बंद केलं. दुसऱ्या ओळखीने पुढे दोघे ‘कॅरी बेन्सी शिप’वर कामाला लागले. या शिपवर रात्रंदिवस काम करावे लागयचे. मुलं काम करताना थकू नयेत, त्यांना कंटाळा येऊ नये यासाठी शिपवरील कॅप्टन त्यांना जबरदस्ती नशेचे डोस द्यायचा. या नशेत मुलं १२ ते १५ तास काम करायची. त्यामुळे पुरेशी झोप आणि जेवण जात नसल्यामुळे अडीच महिन्यांनी पैसे न घेताच दोघांनी शिपवरून पळ काढला.

नशेमुळे संदीपचा दुर्दैवी मृत्यू

त्यानंतर दोघेही शिपूला येऊन जगदीपला शोधू लागले. मात्र तो न सापडल्याने दोघेही ‘सिनो हँड्रो कंपनी’त हेल्पर म्हणून कामाला लागले. तिथे नशेच्या आहारी गेलेला संदीप आजारी पडला. श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे मलेशियातील ‘कपिता रुग्णालयात’ल्या अतिदक्षता विभागात त्याला दाखल केले. मात्र दोन दिवसांनी उपचारांदरम्यान संदीपचा मृत्यू झाला. संदीपच्या या संशयास्पद मृत्यूची तेथील पोलिसांनीही दखल घेतली. मात्र, पैशांचे आमिष दाखवून एजंटने सर्व गुंडाळून टाकले. अशा प्रकारे नुसता संदीपचाच बळी गेला नसून देशातील विविध राज्यांमधील पाच जणांचा काही महिन्यांत अशा प्रकारे मृत्यू झाल्याचे संदीपचा मित्र विक्रमने 'मुंबई लाईव्ह’शी बोलताना सांगितले.

मतदेहासाठी एजंटने मागितले २ लाख

संदीपच्या मृत्यूची बातमी विक्रमने त्यांच्या घरातल्यांना दिली. तसेच संदीपचा मृतदेह भारतात पाठवण्यासाठी कंपनी अर्धा खर्च करण्यास तयार आहे. मात्र, अर्ध्या खर्चाचे पैसे पाठवण्यास एजंट जगदीपने संदीपच्या वडिलांना सांगितले. तसेच पैसे न पाठवल्यास मुलाचा मृतदेह पाठवणार नसल्याची धमकी त्यांना जगदीपकडून देण्यात आल्याचे ब्रम्हदेव यांनी ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना सांगितले.

या सर्व प्रकाराबाबत ब्रम्हदेव यांनी सर्व हकिगत आसपास राहणाऱ्या रहिवाशांना सांगितल्यानंतर त्यांनी भारतीय राजदूतांशी संपर्क साधला. त्यानंतर मुलाचा मृतदेह भारतात आणण्यासाठी सरकारने पाऊले उचलली असून मंगळवारी रात्री संदीपचा मृतदेह भारतात आणणार असल्याची माहिती ब्रम्हदेव यांनी दिली. या प्रकरणी जगदीप आणि औतार सिंग यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी पाऊले उचलणार असल्याचेही ब्रम्हदेव यांनी सांगितले.


हेही वाचा

भाजीवाला झाला करोडपती! लुबाडले कोट्यवधी रूपये

पुढील बातमी
इतर बातम्या