भाजीवाला झाला करोडपती! लुबाडले कोट्यवधी रूपये

'इसकी टोपी उसके सर' असे करत घर देण्याच्या आश्वासनाखाली या ठगाने आतापर्यंत ८० हून अधिक पोलिसांना फसवल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या फसवणुकीत वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. एवढेच नव्हे, तर हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेते व अभिनेत्रींशी त्याचे जवळचे संबध आहेत.

भाजीवाला झाला करोडपती! लुबाडले कोट्यवधी रूपये
SHARES

90 च्या दशकात भायखळा परिसरात वडिलांचा भाजीचा व्यवसाय संभाळणाऱ्या एका ५२ वर्षीय करोडपती आरोपीचा आतापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. अविनाश सुरेश रासकर असे या आरोपीचे नाव आहे. 'इसकी टोपी उसके सर' असे करत घर देण्याच्या आश्वासनाखाली या ठगाने आतापर्यंत ८० हून अधिक पोलिसांना फसवल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या फसवणुकीत वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. एवढेच नव्हे, तर हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेते व अभिनेत्रींशी त्याचे जवळचे संबध आहेत. त्याच्यावर मुुंबईसह नवी मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.


कसे लुबाडले कोट्यवधी रूपये?

मूळचा पुण्याच्या जुन्नर परिसरात राहणारा अविनाश हा पूर्वी इस्टेट एजंट म्हणून काम करायचा. मात्र, कालांतराने मुंबईत येऊन त्याने वडिलांचा भायखळा येथील भाजीपाल्याचा व्यवसाय संभाळला. झटपट श्रीमंत होण्याची तो नेहमी स्वप्न पहायचा. त्यातूनच त्याने भाजीपाल्याचा व्यवसाय सोडून मुंबईत २००४ मध्ये डेव्हलपर्सचा व्यवसाय सुरू केला. २००६ मध्ये पहिल्यांदा त्याने पुनर्वसन प्रकल्पात भायखळ्यातील माजी नगरसेवक सत्यवान जावकर यांच्यासह शंभर जणांना फसवले. त्यानंतर हा अनेकांना मार्केट रेट पाहून त्यानुसार अर्ध्या किंमतीत घर देण्याचे आश्वासन द्यायचा.


पोलिसांकडूनही उकळले पैसे

नुकताच अविनाशने सिडको येथील जमीन मालकाला पैसे देऊन त्यालाही खिशात ठेवले होते. हीच जमीन दाखवून या ठिकाणी सिडकोच्या मदतीने डेव्हलपमेंट करणार असल्याचे त्याने अनेकांना सांगितले. मार्केट भावाहून अनेकांना कमी किंमतीत घर उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली त्याने पोलिस निरीक्षकांपासून ते शिपायांपर्यंत सगळ्यांकडून कोट्यावधी रुपये उकळले.


गँगस्टरच्या भावासोबत चांगले संबंध

नुकतीच आग्रीपाडा पोलिसांनी त्याला चेक बाऊन्सच्या केसमध्ये मुलुंडच्या सिंधी कॉलनीतून अटक केली आहे. देणे कऱ्यांपासून लपून राहण्यासाठी तो मुलुंडला रहात होता. भायखळ्यातील एका गँगस्टरच्या भावासोबत त्याचे चांगले संबध असल्याने त्याची दहशतही तितकीच होती. कालांतराने मोरया डेव्हलपर्स या नावाखाली बांधकाम व्यावसायिक म्हणून त्याने काम सुरू केले. अविनाश विरोधात शिवाजी पार्क, शिवडी, आरए किडवई, आग्रीपाडासह कामोठा पोलिस ठाण्यात फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद असून नागरिक मोठ्या प्रमाणात तक्रारी नोंदवण्यासाठी पुढे येत आहेत.


सिनेकलाकारांशीही जवळीक

शिवाजी पार्कमध्ये अविनाशचे कार्यालय असल्यामुळे अनेक राजकिय पक्षातील नेत्यांच्या तो संपर्कात होता. त्याच ओळखींवर त्याने हिंदी व मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांवर आपल्या गोड बोलण्यातून प्रभाव टाकला होता. अनेकांनी घरासाठी त्याच्याशी संपर्क साधला होता. मात्र, त्याच्यावरील गुन्हे उघडकीस आल्यानंतर अनेकांनी हात आखडता घेतल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. सध्या अविनाशला कामोठे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.



हेही वाचा

'तमाशा'त घडला 'तमाशा'


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा