वाहतूक शाखेच्या पोलिसांसोबत आता अरेरावी करणे सहज शक्य होणार नाही. वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर लवकरच कॅमेरे लावण्यात येणार आहे. पोलिसांवरील हल्ले व पोलिसांच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूरात ‘बॉडी वॉर्न कॅमेरे' वाटप केले. पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी हा निर्णय घेतला आहे.
वाहतूक पोलिसांसोबत वाहनधारकांचे वाद होऊन हल्ले झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये वाहतूक पोलिसांच्या हालचालीसोबतच भ्रष्टाचार आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या विरोधात पुरावे देखील या उपक्रमातून मिळवता येणार आहेत. हे कॅमेरे पोलिसांच्या खांद्यावर व छातीवर लावण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोलिसांच्या कामावरही लक्ष ठेवता येणार आहे. आंदोलन, दंगल, अपघात आणि छापा टाकताना देखील या कॅमेऱ्याचा पुरावा म्हणून वापर होणार आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी नागपुरातील एका कार्यक्रमात वाहतूक पोलिसांना ‘बॉडी वॉर्न कॅमेरे' वाटप केले. अशा उपकरणांमुळे रस्त्यावर शिस्त लावण्यास मदत होईल. यामधील फुटेज नियमांचे उल्लंघन करणार्यांविरूद्ध पुरावे म्हणून वापरता येईल. वाहतूक पोलिसांना त्यांचे काम चोखपणे बजावता यावे यासाठी बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांची मदत होणार आहे. नागपूरप्रमाणे इतर शहरांनाही वाहतूक सुव्यवस्थेसाठी लवकरच बॉडी वॉर्न कॅमेरे देण्यात येतील, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे केले.
हेही वाचाः- संबंधित विषयाची 'माहिती' महापालिका देणार ऑनलाइन
शहरात १६३ ट्रॅफिक सिग्नल असून कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी६,६८८ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पोलिसांना काही दिवसांत ड्रोनही मिळणार आहेत. त्यांनी माहिती दिली की, वाहतूक नियम मोडणाऱ्या लोकांकडून १६ कोटी रुपये दंड प्रलंबित असून ही रक्कम वसूल करण्यासाठी लवकरच एका खासगी एजन्सीशी करार केला जाईल.