पोलिस दलातील कडक शिस्तीचे अधिकारी अशी ओळख असलेले अतिरिक्त पोलिस महासंचालक हिमांशू रॉय यांनी शुक्रवारी आपल्या चर्चगेट येथील सुरुची या शासकीय इमारतीत राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली. फक्त पोलिस दलातच नव्हे तर राजकीय नेतेमंडळी, बॉलिवूड कलाकार ते पत्रकारांपर्यंत सगळ्यांशीच त्यांचं चांगलं नातं होतं.
एक कर्तबगार अधिकाऱ्याने अशा प्रकारे जगाचा निरोप घेतल्याने पोलिस दलासह सगळ्यांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्याने राजकीय नेतेमंडळींपासून ते बॉलिवूड कलाकारांनीही ट्विटरच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केलं आहे.
राज्य आणि मुंबई पोलिस दलात अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळणारे वरिष्ठ अधिकारी हिमांशू रॉय यांच्या आकस्मिक निधनाने एक कर्तबगार अधिकारी आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. 'रॉय यांनी पोलीस दलात विविध महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळताना अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा छडा लावला आहे. एक धडाडीचे अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या निधनामुळे एका कार्यक्षम अधिकाऱ्याला आपण मुकलो अाहोत, असं मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात.
हेही वाचा -
अतिरिक्त पोलिस महासंचालक हिमांशू राॅय यांची गोळी झाडून आत्महत्या