ब्रँच मॅनेजरने बँकेलाच घातला ३ कोटींचा गंडा

बोगस क्रेडिट कार्डच्या मदतीने बँकेलाच ३ कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या ब्रँच मॅनेजरला शिवडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. नदरूल मुजावर असं या मॅनेजरचं नाव असून न्यायालयाने त्याला ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

बोगस ग्राहक दाखवले

युनियन बँकेत चीफ मॅनेजर पदावर कार्यरत असलेले मुजावर याची २०१२ मध्ये युनियन बँकेच्या क्रेडिट कार्ड रिकव्हरी विभागात बदली झाली होती. युनियन बँकेचे हे रिकव्हरी विभागाचे कार्यालय शिवडी पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या रे रोड परिसरात आहे. मागील सात वर्षापासून मुजावर हे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांकडून पैसे जमा करून घेऊन तो अहवाल पुढे बँकेला पाठवत होते. या अहवालात मुजावर यांनी बोगस ग्राहक दाखवून बँकेकडून मिळणारा मोबदला स्वत: च्या खात्यावर जमा करून घेतला. सर्व काही अलबेल सुरू असताना नोव्हेंबर २०१८ मध्ये मुजावर यांची त्या विभागातून बदली झाली. त्या विभागात नव्याने आलेल्या चीफ रिकव्हरी विभागाच्या अधिकाऱ्याने मुजावर यांची फसवणूक पकडली. 

२०१२ पासून गंडा

मुजावर यांनी बँकेची ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे दाखवून देत, बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली. त्यानंतर मुजावर यांना बँकेने काढून टाकत २० डिसेंबर रोजी शिवडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. प्रथमदर्शी ही फसवणूक ३४ लाख रुपये असल्याचे पुढे आले होतेे. मात्र पोलिस तपासात मुजावर यांनी २०१२ पासून बँकेला तब्बल 3 कोटी रुपयांना गंडवल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी मुजावरला अटक केली. फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कुऱ्हाडे यांनी सांगितले.


हेही वाचा - 

पोलिस निरीक्षकाला २२ लाखांची लाच घेताना अटक

Video- जोगेश्वरीत भरधाव कारनं तरुणीला उडवलं, तरूणी कोमात


पुढील बातमी
इतर बातम्या