वांद्रे गर्दी प्रकरण: विनय दुबे जामिनावर बाहेर

वांद्रे इथं १४ एप्रिल रोजी झालेल्या गर्दीप्रकरणी अटकेत असलेला आरोपी विनय दुबे याला वांद्रे न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. संचारबंदीच्या कायद्याचं उल्लंघन करत गर्दी जमा केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं.

उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष असलेला विनय दुबे याचा मुंबईतील उत्तर भारतीय आणि पश्चिम बंगालमधील मजुरांशी चांगला संपर्क आहे. मूळचा उत्तर प्रदेशातील भदोही येथील असलेला दुबे नवी मुंबईतील ऐरोली इथं राहतो. लाॅकडाऊनमुळे ठिकठिकाणी अडकलेल्या मजुरांना चिथावणी देणारा एक व्हिडिओ दुबे याने सोशल मीडियावर टाकला होता. या व्हिडिओत लोकांना आपापल्या गावी जाण्याची परवानगी न दिल्यास त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशपर्यंत पायी चालत जाण्याचा निर्धार त्याने व्यक्त केला होता. 

हेही वाचा - विनय दुबेचा मनसेशी संबंध काय? ‘हे’ आहे खरं कारण

त्याच्या आवाहनानंतर वांद्र्यात सुमारे ३ ते ४ हजार परप्रांतीय मजूर जमले होते. तिथं सोशल डिस्टन्सिगचं उल्लंघन झाल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुरू नसतानाही लोकांची इतकी गर्दी कशी झाली, याचा शोध घेताना पोलिसांना दुबेचा व्हिडिओ दिसला. त्यानंतर त्याला ऐरोलीतून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून दुबे हा तुरूंगातच होता.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत असलेल्या फोटोवरून दुबे याचा मनसेशी संबंध जोडण्याचाही काही जणांनी प्रयत्न केला होता. पोलिसांनी अटक केलेला विनय दुबे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा काहीही संबंध नाही. त्याने एकदा राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांशी संवाद साधायला बोलावलं होतं, इतकंच. वांद्रे घटना, दुबे आणि मनसे असा संबंध लावण्याचा जो प्रकार सुरू आहे, तो चुकीचा आहे, असा खुलासा मनसेच्या एका नेत्याने केला होता.  

 हेही वाचा - यूपीतल्या साधू हत्याकांडावरून राऊतांचा भाजपला टोमणा, म्हणाले पालघरसारखं राजकारण नको

पुढील बातमी
इतर बातम्या