Advertisement

विनय दुबेचा मनसेशी संबंध काय? ‘हे’ आहे खरं कारण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतचा विनय दुबेचा एक फोटो व्हायरल होत असल्याने त्याचा मनसेशी संबंध जोडण्यात येत आहे. मात्र विनय दुबेचा आणि मनसेचा कुठलाही संबंध नसल्याचा खुलासा मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी केला.

विनय दुबेचा मनसेशी संबंध काय? ‘हे’ आहे खरं कारण
SHARES

मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात परप्रांतीय मजुरांची गर्दी गोळा करत लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी उत्तर भारतीय संघटनेचा अध्यक्ष विनय दुबे याला मुंबई पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतचा विनय दुबेचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने त्याचा मनसेशी संबंध जोडण्यात येत आहे. परंतु विनय दुबेचा आणि मनसेचा कुठलाही संबंध नसल्याचा खुलासा मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी केला आहे.

पोलिसांनी अटक केलेले विनय दुबे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा काहीही संबंध नाही. त्यांनी एकदा राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांशी संवाद साधायला बोलावलं होतं, इतकंच. वांद्रे घटना, दुबे आणि मनसे असा संबंध लावण्याचा जो प्रकार सुरू आहे, तो चुकीचा आहे, असं शिंदे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून म्हटलं आहे.

हेही वाचा-वांद्रे गर्दी प्रकरणी अटक केलेल्या दुबेची पोलिस कोठडीत रवानगी

राज यांच्यासोबत फोटो

उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष असलेल्या विनय दुबे याने डिसेंबर २०१८ मध्ये उत्तर भारतीय मेळाव्याचं आयोजन करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रीत केलं होतं. या मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्याचवेळी राज ठाकरे यांच्यासोबत व्यासपीठावर काढलेले काही फोटो विनय दुबे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर टाकले. मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासोबतही दुबे याचा एक फोटो आहे.

एवढंच नाही, तर विनय दुबे याने कल्याण लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूकही लढवली होती. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार डाॅ. श्रीकांत शिदे यांनी त्याचा पराभव केला होता.  

'असा' लागला शोध 

विनय दुबे याचा मुंबईतील उत्तर भारतीय आणि पश्चिम बंगालमधील मजुरांशी चांगला संपर्क आहे. मूळचा उत्तर प्रदेशातील भदोही येथील असलेला दुबे नवी मुंबईतील ऐरोली इथं राहतो. लाॅकडाऊनमुळे ठिकठिकाणी अडकलेल्या मजुरांना चिथावणी देणारा एक व्हिडिओ दुबे याने सोशल मीडियावर टाकला होता. या व्हिडिओत लोकांना आपापल्या गावी जाण्याची परवानगी न दिल्यास त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशपर्यंत पायी चालत जाण्याचा निर्धार त्याने व्यक्त केला होता. त्याच्या आवाहनानंतर वांद्र्यात मोठी गर्दी जमली. तिथं सोशल डिस्टन्सिगचं उल्लंघन झाल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुरू नसतानाही लोकांची इतकी गर्दी कशी झाली, याचा शोध घेताना पोलिसांना दुबेचा व्हिडिओ दिसला. त्यानंतर त्याला ऐरोलीतून अटक करण्यात आली.   

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा