मोपलवारांकडून मागितली १० कोटींची लाच, मांगले दाम्पत्याला अटक

वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून निलंबित समृद्धी महामार्गाचे माजी एमडी राधेश्याम मोपलवार यांच्याकड़ून १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ठाणे खंडणीविरोधी पथकाने सतीश मांगले आणि श्रद्धा मांगले या दाम्पत्याला शुक्रवारी रात्री १ कोटी रूपयांचा हप्ता घेताना डोंबिवलीत रंगेहाथ अटक केली.

काय आहे प्रकरण?

समृद्धी महामार्गासहीत इतर प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झेलणाऱ्या मोपलवारांचे मोबाईलमधील संभाषण लीक झाल्याने ते चांगलेच गोत्यात आले होते.

ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश मांगलेने एक संदिग्ध आॅडियो क्लिप प्रसारमाध्यमांना देत ही आॅडियो क्लिप राधेश्याम मोपलवार यांची असल्याचा दावा केला. त्यानंतर सतीश मांगले आणि त्याची पत्नी श्रद्धा यांनी विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांना तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना भेटून मोपलवारांवर आरोप केले.

'अशी' मागितली खंडणी

एवढ्यावर न थांबता सतीश, श्रद्धा मांगले आणि त्यांचा एक मित्र अनिल वेदमेहता यांनी मोपलवारांना भेटून त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे सगळे आरोप मागे घेण्यासाठी तसेच आॅडियो क्लिप परत देण्याच्या बदल्यात १० कोटी रूपयांची मागणी केली.

मुलीला जीवे मारण्याची धमकी

३१ ऑक्टोबरला सतीश मांगले आणि त्याच्या पत्नीने जे डब्लू मॅरिएट होटेलमध्ये मोपलवारांची भेट घेतली. यावेळी खंडणीच्या रकमेत तडजोड होऊन ही रक्कम ७ कोटी रुपये ठरवण्यात आली. या तडजोडीतही ७ कोटी न दिल्यास राधेश्याम मोपलवार आणि त्यांची मुलगी तन्वी हिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

व्हिडियो पाहून अटक

त्यानंतर मोपलवार यांनी ठाणे पोलिसांकडे तक्रार नोंदवली. ठरल्याप्रमाणे मोपलवार १ कोटी रुपयांचा हप्ता घेऊन डोंबिवलीतील लोढा पलावा या ठिकाणी गेले. त्यांनी हप्ता देतानाचा व्हिडिओ मांगलेच्या नकळत काढला. हा व्हिडिओ पोलिसांना दिल्यानंतर ठाणे खंडणी विरोधी पथकाने मांगले दाम्पत्याला अटक केली.

कोण आहे सतीश मांगले?

सतीश मांगले हा एक खाजगी गुप्तहेर असून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध ठेऊन त्यांचे फोनवरील संभाषण रेकॉर्ड करण्याची त्याला सवय आहे. यापूर्वी सतीश मांगलेवर मिरा रोड येथे बलात्काराचा, तर वांद्रे पोलीस ठाण्यात आयटी अॅक्ट उल्लंघनाच्या गुन्ह्याची नोंद आहे.


हेही वाचा-

मोपलवार प्रकरणावरून दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक


पुढील बातमी
इतर बातम्या