डॉ. अमरापूरकर मृत्यूप्रकरण : महापालिकेला उच्च न्यायालयाची नोटीस

डॉ. आमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने मुंबई महापालिकेला नोटीस बजावत २ आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

बॉम्बे हॉस्पिटलचे नामांकीत पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा २९ ऑगस्टच्या पावसात प्रभादेवीतील खुल्या मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेला मुंबई महापालिका जबाबदार असल्याचा दावा करत 'फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर'ने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

दोषींवर कारवाई, नुकसान भरपाई

या याचिकेत महापालिकेविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, दोषी अधिकऱ्यांवर तातडीने करवाई करावी तसेच ५० लाख रुपयांची नुकसान भरपाईची मागणीही याचिकाकर्त्यांनी केली.

मागण्या फेटाळल्या

मात्र, या दोन्ही मागण्या उच्च न्यायालयाने फेटाळल्या. याचिकाकर्त्यांमध्ये डॉ. अमरापूरकर यांचा एकही नातेवाईक नसल्याची बाब न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या लक्षात यावेळी आणून दिली.

तसेच न्यायालयाने गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांत तक्रार दाखल करण्यास किंवा दंडाधिकाऱ्यांकडे खाजगी तक्रार करण्यास याचिकाकर्त्यांना सांगितले आहे. त्याचबरोबर ५० लाखांच्या नुकसान भरपाई प्रकरणी दिवाणी दावा दाखल करण्यासही सांगितले आहे.

अशी घडली घटना

प्रभादेवीत राहणारे डॉ. अमरापूरकर मंगळवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास बॉम्बे हॉस्पिटलमधून घरी जाण्यास निघाले. लोअर परळ येथील इंडिया बुल्सजवळ त्यांनी आपली गाडी थांबवली. त्यानंतर, १० मिनिटांच्या अंतरावर घर असल्याने 'मी चालत जाईन' असे म्हणत ते गाडीतून उतरले आणि गुडघाभर पाण्यातून वाट काढत चालत राहिले. पण ते घरी पोहोचलेच नाही.

पाण्याचा निचरा व्हावा म्हणून महापालिका कर्मचाऱ्यांनी एल्फिन्स्टनमधील मॅनहोलचे झाकण काढले होते. पण त्याचा अंदाज न आल्याने डॉ. अमरापूरकर त्यात पडले. अखेर त्यांचा मृतदेह दोन दिवसांनी गुरुवारी सकाळी पोलिसांना वरळी कोळीवाड्यात सापडला.


हे देखील वाचा -

कटू अनुभव सुखद ठरला! मुसळधार पावसात फ्रेंच कुटुंबाला गुरूद्वाराने दिला आसरा


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

पुढील बातमी
इतर बातम्या