सायबर गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ, मात्र आरोपींना पकडण्यात पोलिस अपयशी

कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी कर्मचा-यांना घरूनच काम करण्याची परवानगी दिली आहे. परिणामी, तंत्रज्ञानाचा वापर वाढला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सायबर गुन्हा दाखल होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. पण तुलनेने गुन्ह्यांचा गुंता सोडवण्याच्या प्रमाणात मात्र घट झाली आहे.

हेही वाचाः- कल्याण डोंबिवलीत २९३ नवे रुग्ण, ९ जणांचा मृत्यू

लॉकडाऊनच्या काळात प्रवासावर अनेक निर्बंध आल्यानंतर अनेक कंपन्यांनी घरूनच काम करण्याची मुभा कर्मचा-यांना दिली. याशिवाय विरंगुळा म्हणून मोबाईल व इतर तांत्रिक साधनांचा वापरही वाढला. चित्रपट, गाणी, ऑनलाईन गेम्स, व्हिडिओ कॉल, व्हिडिओ कॉन्फन्सिंग आदीमध्ये वाढ झाली. यावर्षी ऑगस्टपर्यंत मुंबई पोलिसांकडे दाखल सायबर गुन्ह्यांचा विचार केल्यास त्यात काही शी वाढ झाली आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत मुंबईत १४८५ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत १४२५ गुन्ह्यांची नोंद झाली होती. यावर्षी १४८५ पैकी केवळ ९७ गुन्हे सोडवण्यात पोलिसांना यश आले आहे. दुसरीकडे गेल्यावर्षी १४२५ पैकी १७६ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते.

हेही वाचाः- मुख्यमंत्र्यांचं राजकीय स्वास्थ्य जपणारा निर्णय

गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण पाहिले, तर यावर्षी ते केवळ साडे सहा टक्के आहे. गेल्यावर्षी हे प्रमाण १२.३ टक्के होते. सुमारे सहा टक्क्यांनी त्यात घट झाली आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये आरोपी बहुदा पर राज्यातील असतात, काही प्रकरणांमध्ये परदेशातूनही फसवणूक होते. सध्या लॉकडाऊनमध्ये इतर राज्यात फिरून आरोपींचा शोध घेणे तेवढे सोपे राहिले नसल्याचे एका अधिका-याने सांगितले. यावर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत सोर्स टेंपरिंगचा एक गुन्हा, मॅन इन द मिड अटॅकचा(तोतयागिरी करून दुस-या खात्यावर पैसे मागवणे) एक गुन्हा, फिशिंगचे २२ गुन्हे, अश्लील ईमेल अथवा संदेश पाठवल्या बद्दल १३३ गुन्हे, बनावट फेसबुक प्रोफाईल तयार केल्याप्रकरणी १८, क्रेडिट कार्ड फसवणूकीचे २४१ गुन्हे व इतर ९६३ गुन्हे दाखल झाले आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या