समलैंगिक संबंध उघडकीस आणण्याची धमकी; साथीदाराचाच काढला काटा

उधारीवर घेतलेले पैसे न दिल्यास समलैंगिक संबंध जगजाहीर करणाची धमकी देणाऱ्या साथीदाराची निर्घुण हत्या करणाऱ्या सलीमअली मुन्ना अन्सारी (२८) या तरुणाला बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.  विशेष म्हणजे आरोपीने हत्या केल्यानंतर रेल्वे अपघातात साथीदाराचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला होता.

उधारीच्या पैशातून हत्या

मूळचा उत्तरप्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यात राहणारा सलीम अली आणि त्याचा साथीदार ज्ञानेश्वर (नाव बदललेले आहे.) हे दोघे मालाडच्या शुक्ला डेअरी येथे कामाला होते.  दोघांमध्ये समलैंगिक संबध होते. काही दिवसांपूर्वी सलीमने ज्ञानेश्वरकडून २६ हजार रुपये उधारीवर घेतले होते. ज्ञानेश्वरला पैशांची गरज असल्यामुळे त्याने सलीमजवळ पैशांसाठी तगादा लावला होता. मात्र पैसे देण्यास सलीम टाळाटाळ करत होता. त्यावरूनच ज्ञानेश्वरने सलीमला दोघांमध्ये असलेले समलैंगिक संबध सर्वांना सांगून बदनामी करण्याची धमकी दिली होती. बदनामी होण्याच्या भितीने मद्यपान केल्यानंतर ज्ञानेश्वरचा तोल जातो याच संधीचा फायदा घेऊन त्याचा काटा काढण्याचा सलीमने डाव रचला.

अपघात झाल्याचा बनाव 

मालाड रेल्वे स्थानकाजवळील हाजीबापू रोडवरील वाईन शाॅपजवळ ज्ञानेश्वरला सलीमने बोलावून घेतले. त्यानंतर दोघेही रेल्वे रूळालगत दारू पिण्यासाठी बसले.  दोघांनीही मद्यपान केल्यानंतर ज्ञानेश्वरचा तोल जात असल्याचे लक्षात आल्यानंतर सलीमने ज्ञानेश्वरला त्याच्याच लुंगीने बांधले. मारताना ज्ञानेश्वर आरडाओरड करेल या भितीने सलीमने त्याची लुंगी फाडून तो कपडा ज्ञानेश्वरच्या तोंडात कोंबला. त्यानंतर चाकूने ज्ञानेश्वरचा गळा चिरत त्याची हत्या केली.  त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर टाकून तो पळून गेला. त्यानंतर अपघातात ज्ञानेश्वरचा मृत्यू झाल्याचा त्याने बनाव रचला.  या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

शवविच्छेदनात उघडकीस 

शवविच्छेदन अहवालात ज्ञानेशवरचा अपघातात मृत्यू झाला नसून त्याची हत्या करण्यात आल्याचं उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपासास सुरूवात केली. परिसरातील शेकडो सीसीटीव्ही तपासले. मात्र, आरोपीची ओळख पटत नव्हती. ज्ञानेश्वरच्या शवविच्छेदनात त्याने मद्यपान केल्याचं सिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सर्व बार आणि वाॅईन शाॅपचे सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी ज्ञानेश्वरसोबत असलेल्या सलीमची पोलिसांना ओळख पटली. सलीमला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.


हेही वाचा -

फटका टोळीने घेतला प्रवाशाचा बळी; कळवा स्थानकातील घटना

क्रिस्टल आग प्रकरण: सुपारीवाला बिल्डरला २ आठवड्यांची न्यायालयीन कोठडी


पुढील बातमी
इतर बातम्या