फटका टोळीने घेतला प्रवाशाचा बळी; कळवा स्थानकातील घटना

फटका टोळीच्या एका चोराने चालत्या लोकलमध्ये दरवाजात उभ्या असलेल्या चेतनच्या हातावर फटका मारून त्याचा मोबाइल खाली पडला. अापला मोबाइल वाचवण्यासाठी त्याने लोकलमधून उडी मारली. मात्र, रुळावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला.

फटका टोळीने घेतला प्रवाशाचा बळी; कळवा स्थानकातील घटना
SHARES

फटका टोळीमुळे अाता मुंबईत चेतन अहिरराव (३५) या अाणखी एका प्रवाशाचा बळी गेला अाहे. मध्य रेल्वेच्या कळवा स्थानकात फटका टोळीच्या एका चोराने चालत्या लोकलमध्ये दरवाजात उभ्या असलेल्या चेतनच्या हातावर फटका मारून त्याचा मोबाइल खाली पाडला. अापला मोबाइल वाचवण्यासाठी त्याने लोकलमधून उडी मारली. मात्र, रुळावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याचा व्हिडीओही समोर आला आहे.




प्लॅटफॉर्म संपल्यामुळं घात

कळवा रेल्वे स्थानकात रविवार १९ ऑगस्ट रोजी रात्री १२.५३ च्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून कल्याणकडं जाणाऱ्या लोकलमध्ये ही घटना घडली. प्लॅटफाॅर्मवर उभ्या असलेल्या अजय सोळंखी (१९) या चोराने धावत्या लोकलमध्ये दरवाजात उभ्या असणाऱ्या चेतन अहिरराव याचा मोबाइल खेचला. त्यावेळी आपला मोबाइल मिळवण्यासाठी त्याने प्लॅटफॉर्मच्या दिशेनं उडी मारली. मात्र, दुर्दैवाने प्लॅटफॉर्म संपल्यामुळं तो रुळावर पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.


मित्राच्या वाढदिवसासाठी मुंबईत

 चेतन हा मुळचा नाशिकचा रहिवाशी असून मित्राच्या वाढदिवसासाठी तो दिवा येथे आला होता. मित्राचा वाढदिवस झाल्यावर रात्री घरी जाताना चेतन दरवाजात उभा होता. त्यावेळी संधी साधून अजयने मोबाइल चोरण्यासाठी त्याचा हातावर फटका मारला. याप्रकरणी अजयला कळवा येथील झोपडपट्टीतून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी दिली.

फटका टोळीची कार्यपद्धती 

गेल्या अनेक वर्षापासून फटका टोळी चोरी करण्यात एक्सपर्ट आहे. फटका टोळीमधील काही जण सकाळी किंवा संध्याकाळी गर्दीच्या वेळी स्टेशनजवळच्या रेल्वे रुळ किंवा फलाटावर उभे असतात. त्यांच्या हातात लांब काठी किंवा धारदार लोखंडी शस्त्र असते. लोकलला गर्दी असल्यानं अनेक प्रवाशी आपल्या स्थानकात उतरण्यासाठी दरवाजाजवळ येऊन उभे राहतात. कित्येकदा प्रवाशी फोनवरही बोलत असतात. अशावेळी फटका टोळी त्यांच्या हातात असलेल्या शस्त्राच्या सहाय्यानं प्रवाशांच्या हातावर जोरात फटका मारतात. त्यामुळं प्रवाशांच्या हातातली वस्तू खाली पडते, आणि पडलेली ती वस्तू उचलून ही टोळी तेथून लगेच पळ काढते.



हेही वाचा-

क्रिस्टल आग प्रकरण: सुपारीवाला बिल्डरला २ आठवड्यांची न्यायालयीन कोठडी

सावधान! कुणालाही देऊ नका महत्त्वाची कागदपत्रे, होऊ शकतो गैरवापर!




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा