सावधान! कुणालाही देऊ नका महत्त्वाची कागदपत्रे, होऊ शकतो गैरवापर!


सावधान! कुणालाही देऊ नका महत्त्वाची कागदपत्रे, होऊ शकतो गैरवापर!
SHARES

खोट्या कागदपत्रांच्या आधारे बँकेतून लोन काढून बँकेला गंडवणाऱ्या चौकडीचा पवई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. प्रवीण बस्तानव नरोना, डेरिक बस्तानव नरोना, सेविअर जून नरोना आणि विल्सन अन्थोनी सवेरी मुथू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आतापर्यंत त्यांच्याकडून कर्जाच्या पैशातून घेतेलेल्या ३ मोटारसायकली, फ्रिज, टीव्ही आणि घरगुती वापराच्या इलेक्ट्राॅनिक वस्तूंसह बनावट कागदपत्रे हस्तगत केली आहेत.


काय आहे प्रकरण?

मुलुंड येथील रहिवासी योगेश भाटीया हे एका लॉजेस्टीक कंपनीचे मालक आहेत. योगेश भाटीया यांना २८ मे रोजी त्यांच्या पवई येथील बँकेने पत्र पाठवून, त्यांनी घेलेल्या लोनचे हप्ते भरल्यामुळे त्यांचं बँक खातं गोठवल्याची माहिती दिली. पत्र वाचताच भाटीया यांच्या पायाखालची जमीन सरकली. कोणतंही लोन घेतलेलं नसताना बँकेने केलेल्या या कारवाईचा जाब विचारण्यासाठी भाटीया यांनी बँकेत धाव घेतली.


कागदपत्रांच्या तपासणीत उघड

चौकशी दरम्यान भाटीया यांनी मोटारसायकलीचे हप्ते न भरल्याने आणि त्याचं ६.५ लाख रुपयांचं कर्ज थकीत असल्यामुळे त्यांचं खातं गोठवण्यात आल्याचं बँकेकडून सांगण्यात आलं. पण कागदपत्रांच्या तपासणीत भाटीया यांचं पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रे बनावट असल्याचं पुढे आलं. या घटनेचं गांभीर्य ओळखून भाटीया यांनी पवई पोलिसांची मदत घेत, लेखी तक्रार नोंदवली.


डोंबिवलीतील बँकेतून

पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासाला सुरूवात करताच भाटीया यांची कागदपत्रे डोंबिवलीतील बँकेच्या शाखेतून आल्याचं स्पष्ट झालं. याचबरोबर आणखी १० ते १२ जणांची बनावट कागदत्रेही पोलिसांना या तपासात आढळून आली. या कागदपत्रांमध्ये भाटीया यांचं पॅनकार्ड, आधारकार्ड, मतदान कार्डही आढळून आलं.


नोकरीच्या नावाखाली

या गुन्ह्याचा तपास कालांतराने डोंबिवलीतील ओम साई इंटरप्रायजेस नावाच्या कार्यालयापर्यंत येऊन पोहोचला. त्यावेळी अटक आरोपींनी ही बोगस कंपनी उघडल्याचं समोर आलं. आरोपी कामगार भरतीच्या नावाखाली बेरोजगारांकडून जमा केलेली कागदत्रे बँकेत देऊन त्याद्वारे कर्ज काढत होते. याच पद्धतीने त्यांनी भाटीयांच्या कागदपत्रांचा वापर करून मुंबई, ठाणे, पालघर भागातील ४ बँका आणि ११ खाजगी फायनान्स कंपनीत कर्जासाठी अर्ज केल्याचं तपासात निष्पन्न झालं.


आरोपींना अटक

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी हे कार्यालय चालवणारे प्रवीण बस्तानव नरोना, डेरिक बस्तानव नरोना, सेविअर जून नरोना आणि विल्सन अन्थोनी सवेरी मुथू यांच्या विरोधात पवई पोलिस ठाण्यात भादवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ नुसार गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली. अटक आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पवई पोलिसांनी दिली.

अटक आरोपींकडून पोलिसांनी आतापर्यंत ३ मोटारसायकली, फ्रीज, टीव्ही आणि घरगुती वापराच्या इलेक्ट्रोनिक वस्तूंसह हस्तगत केल्या असून, त्यांनी अजून किती जणांना अशा प्रकारे ठगवलं आहे, याचा तपास करत आहेत.हेही वाचा-

उधारीचे पैसे न दिल्याने जामिनदाराचं अपहरण, पोलिसांनी केली सुटका

एकतर्फी प्रेमातून तरुणीला मिठी मारणारा अटकेतRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा