उधारीचे पैसे न दिल्याने जामिनदाराचं अपहरण, पोलिसांनी केली सुटका


उधारीचे पैसे न दिल्याने जामिनदाराचं अपहरण, पोलिसांनी केली सुटका
SHARES

उधारीचे पैसे न देणाऱ्याचे जामिनदार राहिलेल्या दोघांचं राजकोटच्या एका व्यावसायिकाने अपहरण केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. मात्र, पोलिसांच्या सतर्ककतेमुळे अपहरणकर्ते अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकले. या प्रकरणी चार आरोपींविरोधात मुंबईतील डी. बी. मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली अाहे.


काय आहे प्रकरण?

मुंबईतील दिनेश शहा या डायमंड मार्केटमधील हिरे व्यापाऱ्याने काही दिवसांपूर्वी राजकोट येथील शब्बीर खान (वय ४७) या व्यावसायिकाकडून १० लाख रुपये घेतले होते. या व्यवहारात अनिल राठोड आणि त्याचा मित्र धर्मेश सागर असे दोघेजण शहासाठी जामिनदार राहिले होते. घेतलेल्या रकमेपैकी ६ लाख रुपये शहा यांनी परत केले. मात्र, उर्वरित ४ लाख रुपये देण्यास शहा टाळाटाळ करीत होते. शब्बीर खान याने पाठपुरावा करूनही शहा उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने शब्बीरने अनिल राठोड आणि त्याच्या धर्मेशला संपर्क केला. पण त्यांनीही हात झटकल्याने शब्बीर संतापला.


'असं' केलं अपहरण

त्यानंतर शब्बीर खान याने मुंबई गाठत साथीदारांच्या मदतीने राठोड आणि धर्मेशला गावदेवी परिसरातून जबरदस्तीने गाडीत कोंबलं. या दोघांनाही कारमधून घेऊन जात असताना त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ड्युटीवर असलेले ताडदेव वाहतूक पोलिस हवालदार प्रमोद पद्मन यांच्या कानावर पडला. त्यांनी हा प्रकार तात्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला कळविला.


'अशी' झाली अटक

नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच गावदेवी पोलिसांच्या गस्ती गाडीवर असलेले कॉन्स्टेबल संतोष जगदाळे, इथापे यांनी पाठलाग करून करमायकल जंक्शनवर या कारला गाठलं. त्यानंतर दोन व्यापाऱ्यांची त्यांच्या तावडीतून सुटका करत राजकोटचा व्यावसायिक शब्बीर याच्यासह अक्रम शेख (४५), बाबू कुंचीकुर्वे (४७) आणि लक्ष्मण कुंचीकुर्वे (३७) या त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतलं. या चौघांविरोधात डी. बी. मार्ग पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली.



हेही वाचा-

एकतर्फी प्रेमातून तरुणीला मिठी मारणारा अटकेत

सिटी लिमोझिन चिटफंड घोटाळ्यातील अाणखी एक घोटाळा उघड



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा