प्रेयसीसाठी लीक केला 'गेम ऑफ थ्रोन्स'?

'तू एकदा होकार दे, तुझ्यासाठी आकाशातून तारेही तोडून आणीन' म्हणत प्रेयसीला भुरळ पाडण्याचा जमाना केव्हाच इतिहासजमा झालाय. हायटेक सेलफोन, रेस्टाॅरंटमधली ट्रीट किंवा महागडे गिफ्ट दिल्याशिवाय नव्या जमान्यातली प्रेयसी ऐकतच नाही, अशी आजची परिस्थिती आहे. पण या महाभागाने त्याही पुढे पाऊल टाकत आपल्या प्रेयसीला खूश करण्यासाठी चक्क 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या मालिकेतील चौथा एपिसोड लीक केल्याची चर्चा रंगली आहे. याप्रकरणी तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने चौघाजणांना अटक केली आहे.

प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

'गेम ऑफ थ्रोन्स' नावाची इंग्रजी मालिका सध्या जोरदार चर्चेत आहे. या मालिकेचा सातवा सीझन सुरू असून जगभरातील तमाम प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोट्यावधी लोक रात्री अपरात्री जागून ही मालिका बघतात. पण ही मालिका तेव्हा चर्चेत आली, जेव्हा या मालिकेचा चौथा एपिसोड येण्यापूर्वीच इंटरनेटवर झळकला. त्यानंतर चौकशी सुरू झाल्यावर समजले की हा भाग भारतातून लीक झाला आहे.

केवळ हौस भागवण्यासाठी?

या प्रकरणी तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने चौघांना अटक केली असून यात कंपनीच्या सध्याच्या कर्मचाऱ्यासह एका माजी कर्मचाऱ्याचा सहभाग आहे. विशेष म्हणजे मोहम्मद सुहेल नावाच्या माजी कर्मचाऱ्याने या एपिसोडची लिंक आपल्या प्रेयसीला शेअर केल्यामुळे केवळ तिला ही मालिका बघण्यासाठी तर सुहेलने हा उपद्व्याप केला नाही ना? याचा तपास पोलीस करत आहेत.

चौघेजण सायबर सेलच्या ताब्यात

या प्रकरणी सायबर सेलने प्राईम फोकस टेक्नॉंलॉजीत टेस्ट इंजिनीयर असलेल्या अभिषेक घडियाल सह, भास्कर जोशी आणि अलोक शर्मा यांना तसेच प्राईम फोकस टेक्नॉलॉजीच्या मोहम्मद सुहेल यांना अटक केली आहे. अभिषेक घडियाल हा टेस्ट इंजिनीयर म्हणून कंपनीत कामाला होता. तर जोशी आणि शर्मा त्याच्या हाताखाली होते.

पासवर्ड अॅक्टिव्हेट केला

मोहम्मद सुहेलने भास्कर जोशीशी संपर्क करून जुना आयडी आणि पासावर्ड अॅक्टिव्हेट केला होता. त्यानंतर हा एपिसोड बघण्यासाठी एक लिंक तयार करण्यात आली. ही लिंक सुहेलने आपल्या प्रेयसीला शेअर केल्याचे सामोर आले आहे.

'गेम ऑफ थ्रोन्स'च्या चौथ्या भागाचा एपिसोड सेव्ह करून भारतात 'हॉट स्टार' नावाच्या स्ट्रीमिंग अॅप वर प्रसारित करण्याची जबाबदारी 'प्राईम फोकस'वर होती. या मालिकेच्या चौथ्या भागाच्या ग्लोबल प्रीमियरच्या दोन दिवस आधी हा चौथा भाग लीक झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी केवळ प्रेयसीला बघण्यासाठी मालिका लीक करण्यात आली की आर्थिक फायद्यासाठी हे कृत्य करण्यात आले याची सध्या पोलीस चौकशी करतात आहेत.


हे देखील वाचा -

बँक कर्मचाऱ्यांनीच मारला डल्ला, बिल्डरच्या खात्यातून काढले ८६ लाख


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

पुढील बातमी
इतर बातम्या