बँक कर्मचाऱ्यांनीच मारला डल्ला, बिल्डरच्या खात्यातून काढले ८६ लाख


बँक कर्मचाऱ्यांनीच मारला डल्ला, बिल्डरच्या खात्यातून काढले ८६ लाख
SHARES

बँकेत ठेवलेली रक्कम ही सुरक्षित असते, अशी सर्वसामान्य बँक ग्राहकांची समजूत मोडीत काढणारा प्रकार नुकताच अंधेरीत समोर आला आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या कर्मचाऱ्यांनी एका बांधकाम व्यावसायिकाचा बनावट चेक छापून, त्यावर खोटी सही करून त्याच्या खात्यातून तब्बल ८६ लाख रुपये काढत बिल्डरसहित बँकेलाही जबरदस्त धक्का दिला आहे. या प्रकरणी बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांसह एमआयडीसी पोलिसांनी एकूण ५ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून आतापर्यंत ४५ लाख रुपये हस्तगत केले आहेत.

जोगेश्वरीच्या मेघवाडीतील शिव समृद्धी डेव्हलपर्सच्या मालकाला त्याच्या पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यातून एकाचवेळी ८६ लाख रुपये काढण्यात आल्यानंतर मोठा धक्का बसला. त्याने तात्काळ याप्रकरणी पोलिसांत धाव घेतली खरी, पण तोपर्यंत हा सगळा पैसा तामिळनाडूतील अॅक्सिस बँकेच्या खात्यात जमा झाला होता.

पोलिसांनीही तत्परता दाखवत हे पैसे गोठवण्याचा प्रयत्न केला. पण हे पैसे बंगळुरू, चेन्नई आणि कोईंबतूरच्या खात्यात वळवण्यात आले होते. एकूण रकमेपैकी २० लाख रुपये गोठवण्यात पोलिसांना यश आले. पण ही चोरी नेमकी कुणी केली याचा पोलिसांना उलगडा होत नव्हता.

जवळपास महिनाभर तपास केल्यानंतर या प्रकरणाचे सूत्रधार दुसरे तिसरे कुणी नसून बँकेचे कर्मचारीच असल्याचे पोलिसांना समजले. खोटा चेक बनवण्यापासून पैसे दुसऱ्या खात्यात वळवण्यापर्यंत साऱ्या उलाढाली या बँक कर्मचाऱ्यांनीच केल्या होत्या.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी ओम प्रकाश बिष्णोई (२५) नागराज देवाडीगा (३६) आणि करण शिंदे सह बँक कर्मचारी चंचल पालव (३६), नितीन किरोडियन (२६) यांना अटक केली आहे. या दोघांनी बिल्डरच्या बँक खात्यात ९० लाखांहून अधिक रक्कम असल्याची माहिती आपल्या साथीदारांना दिली. त्याचप्रमाणे बिल्डरचा खोटा चेक छापून, त्यावर बनावट साक्षरी करण्यासही मदत केली आणि त्यानंतर हा चेक पास देखील करून घेतला.

"खाते धारकाकाडून चेकद्वारे एवढी मोठी रक्कम काढली जात असताना बँकेकडून या व्यवहाराची पडताळणी होणे गरजेचे असते. मात्र या प्रकरणात असे काहीही न झाल्याने आमचा संशय बळावला आणि आम्ही त्या दिशेने तपास सुरू केला." अशी माहिती झोन १० चे डीसीपी नावीनचंद्र रेड्डी यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.
या प्रकरणी आम्ही ४५ लाख रुपये गोठवले असून आणखीन दोन आरोपींचा शोध घेत असल्याचेही ते पुढे म्हणाले.



हे देखील वाचा -

स्टेट बँकेला फसवल्याप्रकरणी रुबी मिलच्या संचालकाला अटक



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा