वृद्धाचे प्राण वाचवणाऱ्या ‘त्या’ शिपायाचा गृहमंत्र्यांनी केला सत्कार

रेल्वेने अथवा लोकलने प्रवास करत असताना योग्य ती सावधगिरी बाळगणे आवश्यक असते. अन्यथा एक छोटीशी चूकही जीवावर बेतू शकते. अनेकदा लोकं लोकलने प्रवास करताना एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी ब्रीजचा वापर करण्याऐवजी रेल्वे ट्रॅकचा वापर करतात. यामुळे अनेकदा त्यांना जीव गमवावा लागतो. असाच एक प्रकार काल मुंबईतील दहिसर रेल्वे स्टेशनवर घडला आहे. याठिकाणी एका व्यक्तीनं दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी ब्रीजचा वापर करण्याऐवजी थेट रेल्वे ट्रॅक ओलांडला आहे. मुंबई पोलिसातील एका जवानाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे या प्रवाशाचा जीव वाचला आहे.रेल्वे पोलिस दलातील पोलीस शिपाई सुजीतकुमार निकम  यांनी स्वतःचे प्राण धोक्यात  टाकून दहिसर रेल्वे स्थानकावर एका ६० वर्षीय व्यक्तीचे प्राण वाचवले,त्याबद्दल त्यांचा सत्कार गृहमंत्री अनिल देखमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याला अनुसरून पोलीस बांधव आपले कर्तव्य करत असतात. त्यातून जेव्हा एखादे मानवतावादी कामगिरी त्यांच्या हातून घडते त्यावेळेस पोलिसांचा, त्यांच्या कामगिरीचा मला प्रचंड अभिमान वाटतो. असे भावोद्गार देशमुख यांनी यावेळी काढले. १ जानेवारीला गणपत सोलंकी हे साठ वर्षाचे गृहस्थ दहिसर  येथून खार ला जाण्यासाठी प्लॅटफॉर्मवर  उभे होते. त्यावेळी दोन नंबर प्लॅटफॉर्मवरून स्लो लोकल जाणार होती, ती पकडण्यासाठी फ्लाय ओव्हर ब्रिज चा वापर न करता रुळावर उडी मारून धावत दुसऱ्या बाजूस असलेली लोकल पकडण्याचा त्यांचा विचार होता. त्यानुसार त्यांनी रूळावर उडी मारली. परंतु विरुद्ध दिशेने येणारी फास्ट लोकल पाहता ते गांगरून गेले त्यांना परत फलाटावर चढता येत नव्हते. हे दृश्य तिथे कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई सुजीत कुमार यांनी पाहिले. परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गणपत सोलंकी यांना फलाटावर ओढून घेतले. व त्यांचा जीव वाचविला. त्यानंतर त्यांच्या मुलाला बोलून त्यांना त्यांच्याकडे सुपूर्द केले. या कामगिरीबद्दल निकम यांचा सत्कार आज गृहमंत्र्यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन केला.

हेही वाचाः- मुंबईत मंगळवारी, बुधवारी १५ टक्के पाणीकपात

यावेळी रेल्वे पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पवार उपस्थित होते. पोलीस दलातील शिपाई पासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत उत्तम काम करणाऱ्या तसेच समाजाप्रती आपला वेगळा तसा उमटवून पोलीस विभागाचे नाव उंचाविणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गृहमंत्र्यांनी नेहमीच सन्मान केला आहे. कोरोना योद्धे, अद्वितीय काम करणाऱ्या नवदुर्गा, कर्तव्यदक्ष असलेले पोलीस कर्मचारी या सर्वांचा सन्मान गेले वर्षभर वेगवेगळ्या माध्यमातून गृहमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला आहे. राज्यातील सव्वा दोन लाख पोलिस कर्मचाऱ्यांचा गृहमंत्री या नात्याने कुटुंब प्रमुख म्हणून पोलीस बांधवांचे मनोबल वाढवणे त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करणे, त्यांच्या सुख दुःखाची दखल घेणे हे आपले कर्तव्य व आपली ती नैतिक जबाबदारी असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख सातत्याने सांगतात
पुढील बातमी
इतर बातम्या