निवडणूक काळात गोंधळ घालणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कंबर कसली, बाँडची रक्कम वाढवली

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी शहरातील राजकीय पाश्वभूमी असलेले आणि त्यांच्यावर दखल व अदखलपाञ गुन्ह्यांची नोंद आहे अशांंवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यावर भर दिला आहे. या कारवाईत पूर्वी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी ५ ते १० हजार रुपयांचे लेखी हमीपत्र घेतले जात होते. मात्र, यंदा दंडात्मक कारवाई म्हणून १ लाख ते दीड लाख रुपयांचे लेखी हमीपत्र (बाँड) लिहून घेतले जात आहे.

तर अटकही होणार

 शहरात निवडणूक प्रक्रियेदरम्यान उपद्रवी ठरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा मुंबई पोलिसांनी उगारला आहे. ज्यांच्यावर य पूर्वी निवडणुकीच्या कालावधीत गुन्हे दाखल आहेत, तसेच इतरही सराईत आरोपींकडून पोलिस   १ ते दीड लाखांचे बाँड लिहून घेत आहेत. या बाँडमध्ये आचारसंहिता काळापासून ते निवडणूक प्रक्रिया (३१मे) संपेपर्यंत बाँड लिहून घेतलेल्या व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केले अथवा या काळात त्याच्यावर दखल अथवा अदखल पात्र गुन्ह्यांची नोंद झाल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दंडात्मक रक्कम न भरल्यास त्या व्यक्तीवर पोलिस अटकेची कारवाईही करू शकतात. ही कारवाई सीआपपीसी १०७, ११० नुसार ही कारवाई केली जाणार आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव बाँम्बे पोलिस अॅक्ट ५५,५६,५७ नुसार तडीपारीचीही कारवाई केली जाऊ शकते.

१०० जणांकडून बाँड

अनेकदा पोलिसांजवळ सूडेच्या भावनेतून चुकीची माहिती येते. त्यामुळेच मिळालेल्या माहितीची चौकशी करून त्याची सत्यता पडताळूनच पुढे ही कारवाई केली जाणार आहे. शिवडी पोलिसांनी आतापर्यंत अशा १०० हून अधिक जणांकडून बाँड लिहून घेतलेे असून २०० हून अधिक जणांची यादी बनवण्यात आली आहे. या पूर्वी दंडात्मक रक्कम ही ५ ते १० हजार रुपये होती. त्यामुळे गुन्हेगारांवर कारवाईचा तेवढा प्रभाव पडत नव्हता. मात्र आता पोलिसांनी दंडात्मक रकमेत वाढ करून लिहून घेतलेल्या हमी पत्रामुळे निवडणूक शांततेत पार पडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

निवडणुकीच्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, कोणीही शांततेस बाधा आणू नये, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार शहरातील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण होऊन निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडेल.

- संतोष वाळके, सहाय्यक पोलिस आयुक्त,  वडाळा विभाग


हेही वाचा -

रेल्वे स्थानकावरून शीतपेय हद्दपार होणार

हार्बर रेल्वेमध्ये पुन्हा स्टंटबाजी, दोघांना अटक


पुढील बातमी
इतर बातम्या