हार्बर रेल्वेमध्ये पुन्हा स्टंटबाजी, दोघांना अटक

हार्बर लोकल ट्रेनच्या दरवाजाला लटकून इतर प्रवाशांना चढू-उतरू न देणं, मोबाइल हिसकावणं तसंच महिला प्रवाशांची छेड काढण्याचे प्रकार सातत्याने सुरूच असतात. त्यातच काही स्टंटबाज जीवावर उदार होत इतर प्रवाशांच्या जीवालाही धोका निर्माण होईल, अशी स्टंटबाजी करतात.

हार्बर रेल्वेमध्ये पुन्हा स्टंटबाजी, दोघांना अटक
SHARES

चालत्या लोकल ट्रेनमध्ये स्टंटबाजी करणं जीवघेणं ठरू शकतं, अशी रेल्वे प्रशासनाने वारंवार सूचना करूनही या स्टंटबाजांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. वडाळा रेल्वे पोलिसांंनी स्टंट करणाऱ्या एकाला बुधवारी अटक केली. ही कारवाई करत असताना स्टंटबाजाच्या मित्राने पोलिसावर हात उचलल्याने पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे.



स्टंटचे व्हिडीओ पोलिसांकडं

हार्बर लोकल ट्रेनच्या दरवाजाला लटकून इतर प्रवाशांना चढू-उतरू न देणं, मोबाइल हिसकावणं तसंच महिला प्रवाशांची छेड काढण्याचे प्रकार सातत्याने सुरूच असतात. त्यातच काही स्टंटबाज जीवावर उदार होत इतर प्रवाशांच्या जीवालाही धोका निर्माण होईल, अशी स्टंटबाजी करतात. यातील आरोपी मोहम्मद हुसेन मकसुद सहा (१८) हा बुधवारी रे रोड स्थानकावर रेल्वेतून स्टंटबाजी करताना पोलिसांना आढळून आला. त्याचे स्टंट करतानाचे अनेक व्हिडिओही पोलिसांजवळ होते. 


पोलिसावर हात उगारला

मोहम्मद याला रे रोडवर गस्तीवर असणाऱ्या पोलिस शिपाई सचिन मंडले यांनी ताब्यात घेतलं. त्यावेळी मोहम्मदचा मित्र मोनू रफिक मोहम्मद शेख (२२) त्या ठिकाणी येऊन अरेरावी करू लागला. एवढ्यावरच न थांबता मित्राला सोडवण्यासाठी त्याने मंडले यांच्यावर हात उगारला. या वेळी गस्तीवर असलेले इतर पोलिस मंडले यांच्या मदतीला धावले.  हे दोघेही विना तिकिट प्रवास करत होते.  या दोघांना वडाळा रेल्वे पोलिस ठाण्यात ३३२, ३५३, ५०४, ३४ भा.द.वि आणि १४७, १५६ रेल्वे कायद्यानुसार गुन्हा नोंदवत  अटक केली आहे. हे दोघेही रे रोड परिसरातील राहणारे आहेत. 


अल्पवयीन मुलांचा समावेश 

यापूर्वी स्टंटबाजी करणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलं आढळून आली होती. या मुलांवर 'ज्युएनाइल अॅक्ट'नुसार कारवाई करणं आरपीएफला कठीण जाऊ लागलं. त्यामुळे स्टंटबाजी करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकांना बोलावून त्यांच्याकडून ''संबंधित मुलगा पुन्हा अशी हरकत करणार नाही,'' असा बाँड लिहून घेण्यास सुरूवात केली. आरपीएफने केलेल्या कारवाईत गोवंडी आणि मानखुर्दमधील तरुणांचं प्रमाण लक्षणीय आहे.


कारवाईत अडचणी

स्टंटबाजी रोखण्यासाठी यापूर्वी रेल्वेने प्रत्येक स्थानकावर ४ पोलिस तैनात केले होते. स्टंटबाज दिसल्यास त्यांचे फोटो काढून हे जवान ज्या दिशेने गाडी जात आहे, त्यापुढील स्थानकावर तैनात जवानांना पाठवाचे आणि स्टंटबाजांना ताब्यात घेऊन कारवाई करायचे. परंतु या कारवाई दरम्यान स्टंटबाज घाबरून पळू लागल्यास आणि दुर्दैवाने त्याला अपघात झाल्यास त्यासाठी जवानांना दोषी मानलं जायचं. त्यामुळे स्टंटबाजांवर कारवाई करताना पोलिस काळजी घेऊ लागले.


स्टंटबाजी करतानाचा ह्या मुलाचा व्हिडिओ आधीपासूनच पोलिसांकडे आला होता. हा मुलगा पुन्हा रे रोड येथे स्टंट करत असताना, रेल्वेचे पोलिस शिपाई मंडले यांनी त्याला पकडले. त्यावेळी त्याचा मित्र त्याला सोडवण्यासाठी त्या ठिकाणी आला. एकट्या मंडले यांना पाहून त्याने त्यांच्यावर हात उगारला. वेळीच इतर गस्तीवरील पोलिस मंडले यांच्या मदतीला धावले. या दोघांवर गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे.

 - राजेंद्र पाल, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वडाळा रेल्वे पोलिस ठाणे 



हेही वाचा -

प्रेमप्रकरणाची माहिती घरी देण्याची धमकी देऊन अत्याचार

अंबानींना १७ कोटींचा चुना; कंपनीच्या माजी संचालकाला अटक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा