मंत्र्यांचे फोन टॅपिंग प्रकरण, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांना समन्स

महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना सायबर सेलकडून समन्स बजावण्यात आलं आहे.  महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या केंद्र सरकारकडे प्रतिनियुक्तीवर आहेत. 

गुप्तचर विभागाच्या प्रमुख  असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. रश्मी शुक्ला या सध्या हैदराबाद येथील निवासस्थानी आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या मुंबईतील सायबर सेल विभागाने हैदराबादच्या डीजीपींच्या हस्तक्षेपाने रश्मी शुक्ला यांना समन्स पाठवले.  २८ तारखेला रश्मी शुक्लांना जबाब नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महिन्याभरापूर्वी पोलीस बदल्यासंदर्भात घोटाळ्यांबद्दल केलेल्या आरोपांमध्ये वरीष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगचा उल्लेख केला होता. तसंच त्यांनी एक अहवाल सुद्धा वाचून दाखवला होता. एवढंच नाहीतर याचा पुरावा केंद्रीय गृहसचिवांकडे देण्यात आला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणाची चौकशी केली असता रश्मी शुक्ला यांच्याकडून माहिती लीक झाल्याचे निदर्शनास आले. 

शुक्ला यांनी रितरस फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. दहशतवादी प्रकरणामध्ये पुरावे शोधून काढण्यासाठी त्यांनी ही परवानगी घेतली होती. पण हे करत असताना रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांचे फोन सुद्धा टॅप केले आहे, असा आरोप काही मंत्र्यांनी केला.

रश्मी शुक्ला या भाजपासाठी काम करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन  आरोप केले.  जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, केंद्र सरकारने काही नियम दिले आहेत. त्यात कोणत्या प्रकारात फोन टॅप करता येतात याविषयी सांगण्यात आले आहे. यात राष्ट्र घातक कृत्य, परकीय देशातील अतिरेकी संघटनेशी संबंध या प्रकारांशिवाय इतर परिस्थिती फोन टॅपिंग करता येत नाही. याला अपवाद येथील शांतता भंग करणाऱ्या व्यक्तीचा फोन टॅप करु शकतो. त्यामुळे रश्मी शुक्ला यांनी जी कारणं दिली होती ती संयुक्तिक नव्हती. त्यांनी ज्या फोन टॅपिंगच्या परवानग्या घेतल्या त्या चुकीच्या नावाने घेतल्या होत्या. परवानगी एकाच्या नावाची आणि फोन टॅपिंग दुसऱ्याची असा प्रकार करण्यात आला. यात अनेक मंत्र्यांचेही फोन टॅप करण्यात आले. हा राईट टू प्रायव्हसीचा भंग आहे. 

रश्मी शुक्ला सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक पदावर हैदराबाद येथे कार्यरत आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत.



हेही वाचा -

सोमवारी रुग्णसंख्येत मोठी घट, ७१ हजार बरे

लशींचे दर कमी करा, केंद्राची सीरम, भारत बायोटेककडे मागणी

पुढील बातमी
इतर बातम्या