कमला मिल आग: वन अबोव्हचे तिन्ही मालक गजाआड

कमला मिल कंपाऊंड आग प्रकरणातील वन अबोव्ह पबचा फरार मालक अभिजीत मानकर याला अखेर मुंबई पोलिसांनी गुरूवारी सकाळी ७.३० वाजता मरीन लाईन्सच्या मरीन प्लाझा येथे अटक केली. तर पबचे इतर दोन मालक क्रिपेश संघवी आणि जिगर संघवी यांना पोलिसांनी बुधवारी रात्री १२.०५ वाजच्या खार परिसरातील केएफसी माॅल इथून ताब्यात घेतलं. त्यानुसार वन अबोव्हचे तिन्ही मालक गजाआड झाले असून चार मुख्य आरोपींपैकी केवळ मोजोस बिस्ट्रो पबचा मालक युग तुलीच फरार आहे. मुंबई पोलिस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून युग तुलीचा शोध घेत आहे. 

कमला मिल कंपाऊंडमधील मोजोस बिस्ट्रो आणि वन अबोव्ह पबला २९ डिसेंबरला भीषण आग लागली होती. या आगीत १४ जणांचा मृत्यू, तर ३० जण गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेवेळी वन अबोव्हचा मालक अभिजीत मानकर घटनास्थळी दाखल झाला. मात्र आगीत मृतांचा आकडा वाढत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने त्याचा मित्र विशाल करियाला घटनास्थळी बोलवून घेतलं. त्यानंतर दोघे वरळी येथील अभिजीतच्या घरी गेले. तेथे अभिजीतने विशालला त्याची आॅडी गाडी घेऊन जाण्यास सांगत पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला.

आगीप्रकरणी पोलिस शोध घेत असल्याने जिगर, क्रिपेश अभिजीतच्या जुहू येथील घरी आश्रयाला आले. अभिजीतच्या काॅल डिटेल्सवरून पोलिस विशालपर्यंत पोहोचले. विशालच्या घराबाहेर अभिजीतची गाडी पाहून पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी विशालला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर विशालने या तिघांना आश्रय देत पळून जाण्यासाठी मदत केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी संघवी बंधूना खार येथून अटक केली असली. तरी हे दोघे करियाच्या घरीच आश्रयाला असल्याने पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकल्याचं सांगितलं जातं अाहे. तर त्यांची चौकशी करताना मानकरदेखील पोलिसांच्या तावडीत सापडला.


हेही वाचा-

कमला मिल आग प्रकरणी विशाल करियाला पोलिस कोठडी


पुढील बातमी
इतर बातम्या