कमला मिल आगप्रकरणी विशाल करियाला पोलिस कोठडी


कमला मिल आगप्रकरणी विशाल करियाला पोलिस कोठडी
SHARES

लोअर परळच्या कमला मिल कंपाऊंडमध्ये वन अबव्ह या पबला लागलेल्या आगीतील फरार आरोपी अभिषेक मानकरला मदत करणाऱ्या विशाल करियाला मंगळवारी एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. विशालने आग लागल्यानंतर अभिजीतची ऑडी कार घेऊन त्याला पळून जाण्यास मदत केली होती. तर आग लागल्यानंतर संघवी बंधू आणि मानकर या तिघांनी करियाच्या घरी आश्रय घेतल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी करियाकडून अभिजीतची गाडी हस्तगत केली आहे. न्यायालयाने करियाला १७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


असा घेतला करियाचा शोध

वन अबव्ह आणि मोजोस बिस्त्रोला २९ डिसेंबर रोजी भीषण आग लागली होती. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता. तर ३० जण गंभीर जखमी झाले होते. आगीचं वृत्त कळल्यानंतर वन अबाओचा मालक अभिजीत घटनास्थळी दाखल झाला होता. मात्र या आगीत मृतांचा आकडा वाढू लागल्याने अभिजीत पार्किंगमधील गाडीत बसून फोनाफोनी करत होता. त्यावेळी त्याने विशाल करियाला फोन करून बोलवून घेतलं.

घटनेची माहिती अभिजीतकडून मिळाल्यानंतर अंधेरीहून विशाल काही मिनिटांत कमला मिलमध्ये हजर झाला. त्यानंतर अभिजीत आणि विशाल हे वरळी येथील अभिजीतच्या घरी गेले होते. त्यावेळी अभिजीतने करियाला कंटाळा आला असल्याचं सांगत त्याची गाडी घेऊन जाण्यास सांगितलं. मात्र पोलिस अभिजीत आणि संघवी बंधूंचा शोध घेत असल्याचं कळल्यानंतर हे तिघेही करियाच्या घरी आश्रयाला गेल्याची कबुली विशाल करियाने पोलिसांना दिली आहे.

तिन्ही फरार आरोपींचा शोध घेताना, त्याचे फोन डिटेल्स पोलिसांनी काढले. त्यावेळी तिघेही करियाच्या संपर्कात असल्याचे निदर्शनास आलं. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक सकपाळ जुहूच्या गांधी ग्रामरोड, इस्कॉन टेंपलसमोर रिवेश बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या विशाल करियाच्या घरी चौकशीसाठी गेले. त्यावेळी विशालच्या इमारतीखाली पोलिसांना फरार अभिजीतची ऑडी कार दिसून आली.



मदत केल्याचा गुन्हा

करियाकडे तिन्ही आरोपींची चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देत होता. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असता त्याने तिन्ही आरोपींना आश्रय दिल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी करियावर आरोपींना पळून जाण्यास मदत केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवत त्याला अटक केली असून बुधवारी त्याला न्यायालयात हजर केलं असता १७ जानेवारीपर्यंत करियाला पोलिस कोठडी सुनावली आहे.



हेही वाचा

कमला मिल आग: आरोपी अभिषेक मानकरच्या मित्राला अटक

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा