कमला मिल आग: आरोपी अभिजीत मानकरच्या मित्राला अटक


कमला मिल आग: आरोपी अभिजीत मानकरच्या मित्राला अटक
SHARES

लोअर परळच्या कमला मिल कंपाऊंडमध्ये वन अबोव्ह पबला लागलेल्या आगीतील फरार आरोपी अभिजीत मानकरला मदत करणाऱ्या विशाल करियाला मंगळवारी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. विशालने आग लागल्यानंतर अभिजीतची आॅडी गाडी घेऊन त्याला पळून जाण्यास मदत केली होती. पोलिसांनी करियाकडून अभिजीतची गाडी ताब्यात घेतली आहे. बुधवारी करियाला पोलिस न्यायालयात हजर करणार आहेत.


कसा पळ काढला?

वन अबोव्ह आणि मोजोस बिस्ट्रो पबला २९ डिसेंबर रोजी भीषण आग लागली होती. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला. तर ३० जण गंभीर जखमी झाले. या आगीचं वृत्त मिळाल्यानंतर वन अबोव्हचा मालक अभिजीत मानकरने क्रिपेश संघवीचा मित्र विशाल करियाशी संपर्क करून त्याला आगीची माहिती दिली. त्यानंतर अंधेरी परिसरात राहणारा करिया घटनास्थळी आला. त्या ठिकाणी मृतांचा आकडा वाढत असल्याचं लक्षात आल्यानंतर करिया अभिजीतच्या वरळी येथील घरी त्याला भेटायला गेला. त्यावेळी अभिजीतने करियाला त्याची गाडी घेऊन जाण्यास सांगितलं. पोलिस अभिजीतचा शोध घेत असतानाही करिया विविध फोन नंबर वापरून अभिजीतशी संपर्क साधत होता.


तपासात निष्पण्ण

पोलिसांनी फरार आरोपींविरोधात लूक आऊट नोटीस जाहीर करत, तिघांचे काॅल डिटेल्स तपासले. या तपासादरम्यान आग लागली तेव्हा अभिजीत करियाच्या संपर्कात असल्याचं निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी जुहू येथील त्याच्या राहत्या घरातून करियाला ताब्यात घेतलं. करियाकडे केलेल्या चौकशीतून त्याने वरील माहिती दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यानुसार पोलिसांनी करियाकडे असलेली अभिजीतची काळ्या रंगाची आॅडी ताब्यात घेतली आहे.



हेही वाचा-

कमला मिल आग: वन अबोव्हच्या मॅनेजर्सना न्यायालयीन कोठडी

युग पाठकला १२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा