युग पाठकला १२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी

ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी 'मोजोस बिस्त्रो'चा मालक युग पाठक आणि ड्युक तुली या दोघांवर गुन्हा नोंदवत युगला शनिवारी न्यायालयात सादर केले. न्यायालयाने युगला १२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

युग पाठकला १२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
SHARES

अग्निशमन दलाने कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीचा अहवाल सादर केल्यानंतर ही आग प्रथम 'मोजोस बिस्त्रो'मध्ये लागल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी 'मोजोस बिस्त्रो'चा मालक युग पाठक आणि ड्युक तुली या दोघांवर गुन्हा नोंदवत युगला शनिवारी न्यायालयात सादर केले. न्यायालयाने युगला १२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलिस आता हुक्का पार्लर विभागातील व्यवस्थापक व कर्मचा-यांचा शोध घेत आहे.


हुक्क्यामुळेच लागली आग

कमला मिल कंपाऊडमधील 'वन अबव्ह' आणि 'मोजोस बिस्त्रो' पबला लागलेली आग ही नेमकी कशी लागली? याबाबतचा अहवाल अग्निशमन दलाने शुक्रवारी सादर केला. त्यामध्ये आग ही प्रथम 'मोजोस बिस्त्रो'मध्ये लागल्याचे म्हटले होते. 'मोजोस बिस्त्रो'च्या दक्षिण पूर्वेकडील भागात हुक्क्याचा निखारा पडद्यावर पडल्यामुळे आग लागल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर आग छतापर्यंत गेल्याचा निष्कर्ष या अहवालात आहे.


ड्युक तुलीविरोधातही गुन्हा

पबमधील ग्राहक, सुरक्षा रक्षक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहिती आणि व्हिडिओच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. तर पबमधील हुक्क्यावरील निखारा पडद्याला पडल्यामुळे ही आग लागल्याचं अहवालात स्पष्ट नमूद केलं आहे. याबाबत पालिकेने दिलेल्या तक्रारीनुसार, ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी 'मोजोस बिस्त्रो'चे मालक ड्युक तुली आणि युग पाठकवर गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणात पोलिसांनी शनिवारी युग पाठकला अटक केली होती. गुरूवारीच पोलिसांनी या प्रकरणी युग आणि ड्युक या दोघांचे जबाब नोंदवले होते.


कमला मिल आग हा अपघात?

दरम्यान, रविवारी युग पाठकला पोलिसांनी शिवडीच्या हॅालिडे कोर्टात हजर केले. त्यावेळी युग पाठकच्या वकिलांनी घडलेला प्रसंग हा एक अपघात असल्याचा दावा केला. आग लागल्यानंतर पबमधील सर्व कर्मचाऱ्यांनी अडकलेल्यांना बाहेर पडण्यास मदत केली होती. तर या दुर्घटनेत 'मोजोस बिस्त्रो'मध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याचा जीव गेलेला अथवा गंभीर जखमी झालेला नाही. संदर्भातील सर्व पूर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत. तर पबमध्ये अग्निप्रतिबंधक सर्व उपाय योजना पबमध्ये होत्या. त्यामुळे ३०४ या कलमांतर्गत गुन्हा नोंदवणे चुकीचे आहे. तर एमआरटीपी अंतर्गत नोंदवण्यात आलेले गुन्हे हे जामीनपात्र असल्याचे मत युगच्या वकिलांनी न्यायालयात मांडले.


'वन अबव्ह'चे मालक अजूनही फरार

युगच्या वकिलांच्या या भूमिकेवर सरकारी वकिलांनी 'या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला असून इतर आरोपींना अद्याप अटक केलेली नाही. त्यामुळे युगला पोलिस कस्टडी मिळावी,' अशी विनंती केली. त्यानुसार न्यायालयाने युगला १२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील इतर आरोपींंचा पोलिस शोध घेत असून 'वन अबव्ह'चे मालक क्रिपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिषेक मानकर हे अद्याप फरार असून पोलिसांनी त्यांची माहिती देणाऱ्यास १ लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.



हेही वाचा

कमला मिलमधील हॉटेल तोडताना दबाव आला; अजोय मेहता यांचा गौप्यस्फोट


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा