Advertisement

कमला मिलमधील हॉटेल तोडताना दबाव आला; अजोय मेहता यांचा गौप्यस्फोट

'मी ऐकणार सर्वांचेच. पण काम करणार कायद्यानुसार हेच माझे तत्व आहे. त्यामुळेच मी तेथील १७ अनधिकृत बांधकामे तोडली आणि तोडत राहणार', असे सांगत अजोय मेहता यांनी मी मागे हटणारा नाही, असे ठणकावून सांगितले.

कमला मिलमधील हॉटेल तोडताना दबाव आला; अजोय मेहता यांचा गौप्यस्फोट
SHARES

"कमला मिल संदर्भात कारवाई करताना एका राजकीय नेत्याने मोठ्या आवाजात मला विचारले की, 'तुम्ही कशी काय कारवाई करता?", असे सांगत कारवाईत राजकीय दबाव आल्याचा गौप्यस्फोट महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सभागृहात केला. 'मी ऐकणार सर्वांचेच. पण काम करणार कायद्यानुसार हेच माझे तत्व आहे. त्यामुळेच मी तेथील १७ अनधिकृत बांधकामे तोडली आणि तोडत राहणार', असे सांगत अजोय मेहता यांनी मी मागे हटणारा नाही, असे ठणकावून सांगितले. ‘त्या’ राजकीय नेत्याचे नाव सांगणार नाही. ते नाव विरोधी पक्षनेत्यांनी शोधावे' असे सांगत त्यांनी दबाव टाकणाऱ्याचे नाव सांगण्याचे मात्र टाळले.

कमला मिल आग दुघटनेच्या मुद्यावरून महापालिका सभागृह पेटले होते. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केलेल्या निवेदनावर सर्वच पक्षांच्या सदस्यांनी दबाव टाकणाऱ्यांची नावे जाहीर करा, अशी मागणी केली होती. यावर सभागृहात बोलताना अजोय मेहता यांनी हा गौप्यस्फोट केला.


दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणारच...

कमला मिल दुर्घटनेनंतर पहिली कारवाई पाच अधिकाऱ्यांच्या निलंबनाची केली. चौकशी झाल्यावर सर्वांवर कारवाई केली जाईल. कुणालाही अद्याप क्लिनचिट दिलेली नाही, असे अजोय मेहता यांनी यावेळी स्पष्ट केले.



अनधिकृत बांधकामांचीही सफाई करू..

या चौकशीचा अहवाल आपण येत्या महिन्याभरात सभागृहापुढे आणू. दोन दिवसांमध्ये आम्ही सुमारे १३०० हॉटेल, पबची तपासणी केली. त्यामध्ये ६७० हॉटेल, पबवर कारवाई केली आणि जिथे अनियमितता आढळून आली आहे, अशी ३० हॉटेलं आम्ही सील केली आहेत. रस्ते, नालेसफाई प्रमाणेच अनधिकृत बांधकामांची देखील सफाई करून दाखवणार, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.


कुणाचीही हयगय करणार नाही...

मुंबईत सध्या जी काही अनधिकृत बांधकामे आहेत, ती संबंधितांनी पुढील १५ दिवसांमध्ये काढून टाकावीत. जर त्यांनी ही अनधिकृत बांधकामे काढली नाहीत, तर महापालिकेच्या वतीने कारवाई केली जाईल. मात्र, यापुढे अनधिकृत बांधकामांवर कोणाचीही गय केली जाणार नाही. कुणालाही सोडले जाणार नाही. हॉटेलमध्ये कर्मचाऱ्यांना झोपणे बंद केले जाणार आहे. जर ते झोपलेले आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


दोन दिवसांत फायर सेफ्टीबाबत कारवाई...

अग्निशमन यंत्रणेत सुधारणा करणे गरजेचे असल्याचे सांगत अग्निशमन दलाच्या ३४ केंद्रांमध्ये अग्निशमन दलाचे तपासणी अधिकारी नेमण्यात येणार आहे. दोन दिवसांमध्ये अग्निशम सुरक्षा कायद्यांतर्गत पुन्हा मुंबईत कारवाई सुरु करणार असल्याचेही अजोय मेहता यांनी सांगितले. या कारवाईत अधिकाऱ्यांना जिथे फायर सेफ्टी नाही असे आढळून आल्यास ती जागा थेट सील केली जाईल. मात्र, अशी कारवाई करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची नोटीस दिली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.


रूफटॉपच्या धोरणावर आयुक्त ठाम

गच्चीवरील हॉटेल अर्थात रुफटॉपच्या धोरणाला काँग्रेससह भाजपाच्या नगरसेवकांकडून विरोध होत असला, तरी आपण रूफटॉपमध्ये काहीही चुकीचे केलेले नाही, भविष्यासाठी रूफटॉप चांगली गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.



हेही वाचा

एकाच दिवशी ३१४ अनधिकृत पब, रेस्टॉरंट बारवर कारवाई; ७ हॉटेल केले सील


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा