Advertisement

कमला मिलमधील 'ती' आग हुक्क्यामुळेच!

कमला मिलमधील आगीचं कारण स्पष्ट झालं असून ही आग ‘मोजोस बिस्ट्रो’मधील हुक्का पार्लरमुळेच लागल्याचं अग्निशमन दलाच्या अहवालात म्हटलं आहे. हुक्क्यामधील जळता निखारा तेथील कापडी पडद्याच्या संपर्कात आल्याने ही आग लागली.

कमला मिलमधील 'ती' आग हुक्क्यामुळेच!
SHARES

कमला मिलमधील आगीचं कारण स्पष्ट झालं असून ही आग ‘मोजोस बिस्ट्रो’मधील हुक्का पार्लरमुळेच लागल्याचं अग्निशमन दलाच्या अहवालात म्हटलं आहे. हुक्क्यामधील जळता निखारा तेथील कापडी पडद्याच्या संपर्कात आल्याने ही आग लागली. मोजोस बिस्ट्रो आणि वन अबोव्ह यांच्या छताचं प्लास्टिक एकाच समांतर रेषेत असल्याने ही आग हवेच्या झोताबरोबर पसरुन वन अबोव्हमध्ये लागली.

या पबच्या बाऊन्सर्सना आपत्कालिन परिस्थितीच्यावेळी ग्राहकांना कशाप्रकारे सुरक्षित ठिकाणी हलवायचं याचं प्रशिक्षण देण्यात आलेलं असलं तरी मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये एका बाऊन्सरचाही समावेश आहे. त्यामुळे बाऊन्सरने या सर्वांना बाहेर जाण्याचा जिन्याचा रस्ता दाखवला असता तर स्वत: सह इतरांचेही प्राण वाचले असते, असंही या अहवालात म्हटलं आहे.


चौकशी अहवाल सादर

कमला मिलमधील वन अबोव्ह आणि मोजोस बिस्ट्रो या पबमधील आगीच्या दुघर्टनेनंतर अग्निशमन दलाने आगीचं कारण शोधण्यासाठी केलेल्या चौकशीचा अहवाल बाहेर आला आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या स्वाक्षरीनंतर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात ही आग मोजोसमधूनच सुरु झाल्याचे नमूद करण्यात आलं आहे.


जळता निखारा कारणीभूत

मोजोस पबमधील दक्षिण- पूर्व कोपऱ्यात असलेल्या हुक्का पार्लरमधील एका हुक्का बॉटलमधील जळता निखारा येथील कापडी पडद्याच्या संपर्कात आल्यामुळे ही आग लागल्याचं म्हटलं आहे. या पबमध्ये ३१ डिसेंबरसाठी आकर्षक सजावट करण्यात आली होती. यासाठी पडदे वगैरे लावण्यात आले होते. त्यामुळे हा पेटता निखारा या पडद्याच्या संपर्कात आल्यानंतर पडदा आणि प्लास्टिक तसेच डेकोरेटीव्ह साहित्याने पेट घेतला. हे दोन्ही पब रुफटॉप असल्यामुळे दोघांच्या छताचं प्लास्टिक एकच होतं. त्यामुळे संपूर्ण प्लास्टीक तसेच लोखंड जळून ते तेथील लोकांच्या अंगावर पडू लागलं.


लिफ्टचा एकच मार्ग

मोजोसमध्ये ही आग लागली तेव्हा वन अबोव्हमध्ये मोठ्या आवाजातील लाऊडस्पिकर सुरु होते. त्यामुळे ग्राहकांना या आगीबाबत काहीच कळालं नाही. परंतु जेव्हा त्यांच्या अंगावर प्लास्टीक तसेच आगीच्या निखारे पडू लागले, तेव्हा वन अबोव्हमधील लोकांची पळापळ सुरु झाली. परंतु त्यांना बाहेर जाण्याचा एकच मार्ग माहीत होता तो म्हणजे लिफ्ट. त्यामुळे सर्वांनी लिफ्टजवळ गर्दी केली. पण लिफ्टमधून केवळ पाचच माणसं जाऊ शकत होती.


टाॅयलेटलाही आगीने घेरलं

परंतु या दोन्ही पबमध्ये त्यावेळी २०० ते २२५ लोक होते. त्यामुळे लिफ्टसाठी गर्दी वाढलेली असतानाच त्यांच्या अंगावर प्लास्टिक गळून पडू लागलं तसेच निखारेही पडू लागले. त्यामुळे यातील काहींनी येथील टॉयलेटमध्ये सुरक्षित जागा शोधली. पण त्यानंतर टाॅयलेटला चारही बाजूंनी आगीने घेरल्यामुळे या आगीत जळालेल्या प्लास्टिक व डेकोरेटीव्ही वस्तूंमुळे कार्बन डायआॅक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड या वायूमुळे आतील सर्वजण गुदमरले आणि त्यात त्यांचा प्राण गेला, असं या अहवालात म्हटलं आहे.हेही वाचा-

कमला मिलमधील हॉटेल तोडताना दबाव आला; अजोय मेहता यांचा गौप्यस्फोट

माझ्यावर गुन्हा का नोंदवला? मोजोस बिस्ट्रोच्या मालकाचा सवाल


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा