प्रेयसीला दिल्या उंदीर मारण्याच्या गोळ्या, संतप्त प्रियकराचा पराक्रम

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

राज्य सरकारने माहितीच्या आधाराअंतर्गत दिलेली आकडेवारी उंदारांची नसून उंदराच्या गोळ्या खरेदी करण्यासाठी केलेल्या खर्चाची आहे, असं म्हणत सरकार उंदीर घोटाळ्याच्या आरोपातून सुटू पहात आहे. तरिही सध्या राज्यभरात उंदीर घोटाळ्याच्या चर्चेला चांगलाच उत आला आहे. त्यातच कांजूरमार्ग परिसरात राहणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाने त्याच्या प्रेयसीला उंदीर मारण्याच्या गोळ्या खाण्यास भाग पाडल्याची घटना घडल्याने सगळ्याचं लक्ष या घटनेकडे वेधलं आहे.

ही घटना रविवारी सकाळी घडली असून उंदीर मारण्याच्या गोळ्या खाऊन प्रकृती खालावलेल्या तरुणीला महात्मा फुले रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

काय आहे घटना?

विक्रोळीच्या कांजूरमार्ग परिसरात राहणारे किसन सोनावणे याचं त्याच परिसरातील २२ वर्षीय तरुणीशी काॅलेजमध्ये ओळख झाली होती. दोघांमधील मैत्रीचं कालांतराने प्रेमात रुपांतर झालं. मागील ५ वर्षांपासून दोघेही एकत्र होते. परंतु काही दिवसांपूर्वी काही कारणामुळे दोघांमध्ये वादविवाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने तरुणीने किसनसोबत बोलणं बंद केलं.

फसवणूक केल्याचा राग

प्रेयसीने आपली फसवूक केल्याचा राग किसनच्या मनात होता. याच रागातून त्याने शनिवारी तरुणीला भेटायला बोलावलं. पण तरुणीने भेटायला येण्यास नकार दिला. त्यावेळी किसनने तिच्या घरी जाऊन सर्वांना मारण्याची धमकी दिली. त्यावेळी घाबरलेली तरुणी रविवारी सकाळी त्याला भेटायला तयार झाली.

'अशा' दिल्या गोळ्या

दुसरीकडे तरुणीला धडा शिकवण्यासाठी किसनने उंदीर मारण्याच्या गोळ्या आणि चाकू सोबत घेतला. विक्रोळी गार्डनमध्ये दोघेही एकमेकांना भेटल्यानंतर किसनने तरुणीला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने किसनला नकार दिला. त्यावेळी संतापलेल्या किसनने तरुणीला मारहाण करण्यास सुरूवात केली.

एवढ्यावरच न थांबता त्याने सोबत आणलेल्या चाकूचा धाक दाखवून तिला उंदीर मारण्याच्या गोळ्या जबरदस्तीने खायला लावल्या. या गोळ्या खाताच काही वेळाने तरुणीला उलट्या होऊ लागल्या. तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर किसनने तिथून पळ काढला.

आरोपीला अटक

बेशुद्ध अवस्थेतील तरुणीवर गार्डनमध्ये आलेल्या स्थानिकांचं लक्ष गेल्यानंतर त्यांनी तिला महात्मा फुले रुग्णालयात दाखल केलं. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून किसनवर विक्रोळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याला अटक केल्याची माहिती विक्रोळी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.


हेही वाचा-

भांडुप पोलिस ठाण्यावर संतप्त नागरिकांचा मोर्चा

भांडुपमध्ये दोन दिवसात चार हत्या


पुढील बातमी
इतर बातम्या